सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८३ वर्षे) यांच्या सेवेत असतांना साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

या लेखमालेत आज आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८३ वर्षे) यांच्या सेवेत असतांना साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती येथे देत आहोत !

पू. भगवंतकुमार मेनराय

१. पू. मेनरायकाकांचे निरपेक्ष प्रेम अनुभवणे

१ अ. पू. मेनरायकाका रुग्णाईत असूनही त्यांनी प्रतिदिन खाऊ देऊन कृतज्ञता व्यक्त करणे : ‘वर्ष २०१९ मध्ये पू. मेनरायकाका रामनाथी आश्रमात असतांना मला त्यांचे ‘कपडे धुणे आणि इस्त्री करणे’, अशी सेवा मिळाली होती. तेव्हा पू. (सौ.) मेनरायकाकू आणि पू. काका दोघेही रुग्णाईत होते. त्यांना अधिक काळ विश्रांतीच घ्यावी लागत असे. मी प्रतिदिन त्यांचे धुतलेले कपडे घेऊन खोलीत गेल्यावर ते पलंगावरून उठून मला काहीतरी खाऊ देत. ते नामजप करत असले, तरी मध्ये थांबून मला खाऊ देत आणि प्रतिदिन कृतज्ञता व्यक्त करत. त्यांच्या या कृतीतून मला त्यांच्यातील प्रेमभाव शिकायला मिळाला.

श्री. ओंकार कानडे

१ आ. पू. मेनरायकाकांनी त्यांचा सदरा वापरण्यासाठी दिल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटणे : त्यांना प्रतिदिन माझ्यामुळे उठावे लागते आणि त्यांच्या नामजपात व्यत्यय येतो; म्हणून मी त्यांच्या खोलीत प्रत्यक्ष न जाता कु. संगीताताईला (त्यांच्या मुलीला) बाहेर बोलावून कपडे देणे चालू केले. काही दिवसांनी त्यांनी मला खोलीत बोलावले आणि मला एक सदरा दिला अन् ते म्हणाले, ‘‘हा चांगला सुती सदरा आहे. मी आतापर्यंत वापरत होतो. आता तू वापरशील ना ?’’ त्या वेळी मला आध्यात्मिक लाभासाठी सदरा मिळाला; म्हणून पुष्कळ कृतज्ञता वाटली.

पू. काका रामनाथीहून देहलीला जातांनाही त्यांनी मला भेटवस्तू दिल्या. प्रत्यक्षात मी त्यांची एक लहानशीच सेवा करत होतो आणि त्यामध्येही पुष्कळ चुका होत होत्या; पण त्यांच्यातील कृतज्ञताभाव आणि प्रेमभाव यांची मला जाणीव झाली.

२. नम्रता आणि इतरांचा विचार करणे

पू. मेनरायकाका रुग्णाईत असल्यामुळे त्यांना लघवीला जाण्यासाठी सारखे साहाय्य लागते. ‘पू. काकांना साहाय्य हवे आहे’, असा निरोप आल्यावर मी लगेच जातो. तेव्हा ‘मला सेवा सोडून लगेच यावे लागते’, याचे पू. काकांना वाईट वाटते. ते मला म्हणाले, ‘‘व्याधीच अशी आहे की, लगेच साहाय्य घ्यावे लागते.’’

३. ज्या गोष्टीसाठी ते स्वतः काहीच करू शकत नाहीत, त्याविषयी ‘त्यांच्या मनात खंत आहे’, असे मला वाटले.

४. अनुभूती

पू. काकांमध्ये असलेल्या भावाच्या स्पंदनांमुळे भावजागृतीचे कोणतेही प्रयत्न न करताही भावजागृती होणे : १४.५.२०२१ या दिवशी मी पू. काकांच्या खोलीत गेल्यापासून माझी अखंड भावजागृती होत होती. त्या वेळी माझ्या मनात भावजागृती होण्यासारखा काहीच विचार नव्हता. तेव्हा एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले मला आठवले, ‘पू. मेनरायकाकांचा भाव इतका आहे की, त्यांच्यासारखा भाव असणारे अन्य कोणतेही संत आपल्याकडे नाहीत.’ त्यामुळे ‘पू. काकांमध्ये असलेल्या भावाच्या स्पंदनांमुळेच मी भावजागृतीचे प्रयत्न न करताही माझी भावजागृती झाली’, असे मला वाटले. यावरून ‘संतांच्या लहानशा सगुण सेवेचाही साधकांना किती लाभ होतो ?’, हे मला शिकायला मिळाले.’

– श्री. ओंकार कानडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक