ऐतिहासिक न्याय !

भारताचा इतिहास गौरवशाली आणि वैभवशाली आहे; कारण तो पराक्रमी, धैर्यवान, वीर राजे-महाराजे, क्रांतीकारक, महापुरुष अशा अनेकांनी मिळून घडवलेला आहे. त्यामुळेच त्या इतिहासाला यशस्वीतेची किनार लाभलेली आहे. महान आणि उज्ज्वल इतिहास घडावा, यासाठी त्याग केलेल्या अन् बलीदान दिलेल्या अशांची नावे आजच्या विद्यार्थ्यांना ठाऊक तरी आहेत का ? कारण आज विद्यार्थ्यांना ‘इतिहास’ नव्हे, तर ‘हिस्ट्री’ शिकवली जाते. हिंदु धर्माचे पालन करणारे राजे यशस्वी कसे झाले, हे शिकवले गेले, तर तो इतिहास असेल ! ‘हिस्ट्री’ हा शब्द मूळ यवन भाषेतील ‘हिस्टोरिया’ या शब्दापासून आला आहे. ‘तर्कपूर्ण निष्कर्षापर्यंत पोचणे’, असा त्याचा अर्थ होतो. यातूनच ‘इतिहासा’चे महत्त्व अधोरेखित होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज मुलांना यशस्वी हिंदु राजांचा नव्हे, (अ)यशस्वी मोगलांचा इतिहास शिकवला जातो. का तर म्हणे, त्यांचा इतिहास सांगितल्याविना छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता कशी कळणार ? कुठे मोगल आणि कुठे छत्रपती शिवाजी महाराज ! खरा इतिहास समोर येण्याची योग्य वेळ आता समीप आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (‘यू.जी.सी.’ने) इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा सिद्ध केला असून त्यात भारतावर आक्रमणे करणार्‍या आणि येथील अनेक वास्तू उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांऐवजी हिंदु राजांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे समजते. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (वर्ष १२०६ ते १७०७)’ अंतर्गत नमूद केलेल्या इतिहासात मोगलांऐवजी त्यांच्या विरोधात लढणारे महाराणा प्रताप आणि हेमचंद्र विक्रमादित्य या हिंदु राजांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या अंतर्गत घेण्यात आलेला निर्णय निश्चितच स्तुत्य आहे. ‘हिंदु राजांचा इतिहास उलगडला जाणे, हे शासनाचे हिंदु राष्ट्राच्या दिशेने पडलेले एक पाऊल आहे’, असे म्हणावे लागेल. या निर्णयाची लवकरात लवकर कार्यवाही झाल्यास हिंदु राजांचे शौर्य, पराक्रम सर्वांच्याच लक्षात येईल. हा तर प्रारंभ आहे. ज्या दिवशी बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना योग्य मान-सन्मान मिळेल, तो सुदिन असेल. मोदी शासनाने घेतलेला हा निर्णय पहाता ‘तो दिवसही दूर नाही’, असेच प्रकर्षाने वाटते.

प्रतिकात्मक छायाचित्र

काँग्रेसचे खरे स्वरूप उघड !

गेली अनेक दशके विद्यार्थ्यांना मोगलांचा इतिहास शिकवला जात होता. त्यामुळे बाबरापासून निजामी, सुलतानी, बहामनी, रेहमानी यांची पिलावळ मोजण्यातच बालपण संपून जात असे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप आदींचाही इतिहास होता; पण ‘८०:२०’ असे प्रमाण अनुक्रमे मोगल अन् हिंदु राजे यांच्या संदर्भात असल्याने ‘राज्यकर्ते कोण ?’ असा प्रश्न आल्यास मोगलच डोळ्यांसमोर येतात. थोडक्यात काय, तर भारताला लाभलेली ५ सहस्र वर्षांची संस्कृती आणि परंपरा हे सर्वकाही सोडून भारताचा इतिहास ७००-७५० वर्षांतील मोगलांच्या आक्रमणापासून चालू होतो आणि १००-१५० वर्षांच्या ब्रिटीश राजवटीपर्यंत येऊन संपतो. हे भारताचे दुर्दैव आहे. आतापर्यंत नेहरू-गांधी यांनी भारताचे वाटोळेच केले. स्वतःच्या राजकीय लाभासाठी शिक्षणक्षेत्राचे विकृतीकरण केले. त्यामुळे खरा आणि सत्य इतिहास बिघडवण्याला नेहरू अन् गांधी हे दोघेच उत्तरदायी आहेत. खरा इतिहास न समजल्याने आजवर अनेक पिढ्या अस्मिताशून्य निपजत गेल्या. ही सर्वांत मोठी हानीच म्हणावी लागेल. आता चुकीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याची वेळ आली आहे. यू.जी.सी.ने उचललेले हे पाऊल खर्‍या अर्थाने धाडसाचे ठरणार आहे. ‘अकबराला वगळून इतिहास कसा काय मांडला जाणार ?’ असा विचार करणार्‍यांसाठी मोदी शासनाचा निर्णय म्हणजे सणसणीत चपराकच ठरली आहे ! काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यू.जी.सी.च्या निर्णयावर टीका केली आहे. मोगलांची गच्छंती केल्यावर काँग्रेसच्या पोटात का दुखते ? यावरूनच काँग्रेसचे धर्मांध आणि पाखंडी स्वरूप उघड होते. मोगलांना वेळीच रोखले नसते, तर आज आपल्या सर्वांना टोपी घालून फिरावे लागले असते, हे सत्य नाकारून चालणार नाही.

शुभस्य शीघ्रम् ।

यू.जी.सी.ने घेतलेला निर्णय अभिनंदनीय तर आहेच; पण ‘त्याच्या जोडीला पुढील स्तरांवरील प्रयत्नही गतीने टप्प्याटप्प्याने व्हायला हवेत’, असे इतिहासप्रेमी हिंदूंना वाटते. त्यामुळे त्यांचाही यू.जी.सी.ने विचार करावा. चुकीचे केले गेलेले इतिहासलेखन आता पालटायलाच हवे. ‘भारतात भारताच्या दृष्टीने भारताचाच इतिहास शिकवला जावा’, असा ठराव सर्वानुमते करायला हवा. विश्वव्यापी इतिहासाच्या सार्वभौम कसोट्यांच्या आधारे इतिहास लिहिला जावा. इतकी वर्षे इस्लामी आक्रमकांचा इतिहासच कानीकपाळी ओरडून सांगितला जायचा; पण त्या आक्रमकांनाही काहींनी विरोध केला, त्यांना नेस्तनाबूत केले; पण तो इतिहास कोण सांगणार ? त्याचेही लेखन होणे आवश्यक आहे. आजवर कोणताही मुसलमान राज्यकर्ता भारताच्या अर्ध्यापेक्षा अधिक भागावर राज्य करू शकला नाही. अल्लाउद्दीन खिलजीलाही तब्बल १७ वर्षे भारतीय राजांसमवेत लढावे लागले. बाबराची तर काहीच क्षमता नव्हती. हुमायूनही राज्य करू शकला नाही. या घटनाही तितक्याच प्रमाणात समोर यायला हव्यात. प्रत्येक वेळी हिंदु राजांना केंद्रबिंदू ठेवूनच भारताचा इतिहास लिहिला जाणे अपेक्षित आहे. आपल्याकडे इतिहासाचे १०१ कोटी कागद उपलब्ध आहेत. इतिहास अभ्यासकांनी त्यांचाही अभ्यास करायला हवा. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक माध्यमांच्या द्वारे सत्य आणि जाज्वल्य इतिहास सर्वांपर्यंत पोचवणे अगदीच सुकर आहे. ‘शुभस्य शीघ्रम् ।’ असे म्हटले जाते. यू.जी.सी.च्या निर्णयामुळे ‘शुभस्य’ तर झालेच आहे, आता ‘शीघ्रम्’ही साध्य झाल्यास खर्‍या अर्थाने भारतीय इतिहासाला न्याय मिळेल !