थकबाकी न भरल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा वीजपुरवठा खंडित !

पिंपरी-चिंचवड येथील आर्.टी.ओ.

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आर्.टी.ओ.) थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने संगमपूल कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पिंपरी-चिंचवड आर्.टी.ओ. येथील वीजपुरवठाही गेल्या १२ दिवसांपासून खंडित केला आहे. पुणे आर्.टी.ओ.कडे १३ लाख ५६ सहस्र रुपयांची, तर पिंपरी-चिंचवड आर्.टी.ओ.कडे ६ लाख ४९ सहस्र रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने अधिकारी-कर्मचार्‍यांबरोबरच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला. वारंवार पाठपुरावा घेऊनही पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील आर्.टी.ओ.ने थकबाकी भरली नसल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यामुळे थकबाकी भरता येत नसल्याचे पुणे आर्.टी.ओ. चे म्हणणे असून ‘पुणे, पिंपरी, अकलूज, सोलापूर आणि बारामती येथील ५ आर्.टी.ओ. कार्यालयांसाठी ४५ लाखांचा निधी मिळावा’, असा प्रस्ताव पुणे आर्.टी.ओ.ने परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठवला आहे.