सौै. अनघा सादिगले
१. गुरुपौर्णिमेनिमित्त नातेवाइकांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नियोजन करतांना अनेक बारकावे शिकायला मिळणे
‘गुरुपौर्णिमेनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचने घेऊ शकतो’, असे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितले होते. ‘ज्या नातेवाइकांना मी यापूर्वी कधीच ‘साधनेचे महत्त्व किंवा साधना म्हणजे काय ?’, हे सांगितले नव्हते, त्या सर्वांना या आपत्काळात लाभ व्हायला हवा’, असा विचार गुरुदेवांनीच माझ्या मनात घातला. या माध्यमातून देवाने मला व्यापकत्व शिकवले.
‘ऑनलाईन’ प्रवचन करतांना नातेवाइकांना ‘एफ्.सी.सी. प्रणाली ‘डाऊनलोड’ करायला शिकवणे, त्यांना ती जोडता येत आहे ना, हे पहाणे, साधकांचा समन्वय साधणे, असे अनेक बारकावे गुरुदेवांनी शिकवले.
२. अर्पणसेवेच्या माध्यमातून शिकायला मिळालेली सूत्रे
मला गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घेण्याच्या संदर्भातील सेवा मिळाली. याआधी मी बरेच महिने (मास) सेवेमध्ये नव्हते. त्यामुळे ‘गुरुदेवांनी या सेवेच्या माध्यमातून मला जवळ केले आहे’, याची माझ्या अंतर्मनाला जाणीव झाली. केंद्रात बरेच वयस्कर साधक आहेत. त्यांना ‘ऑनलाईन’ अर्पण कसे घ्यायचे ?’, हे ठाऊक नसतांनाही त्यांनी ते शिकून घेतले. त्यांची सेवेची तळमळ पाहून मला पुष्कळ शिकता आले. त्यामानाने माझे प्रयत्न अत्यल्प झाले. गुरुदेवांनी सर्व सेवा करून घेतल्याविषयी कृतज्ञता.’
श्री. अनिल नाकील
१. गुरुपौर्णिमेची घरी सिद्धता करतांना ‘घर म्हणजे सभागृह’, असे वाटून आनंद आणि चैतन्य अनुभवणे
‘गुरुपौर्णिमेच्या आदल्या रात्रीपासून सिद्धता करतांना ‘प्रत्यक्ष व्यासपीठ सजवत आहे’ आणि गालिच्यावर आसंदी ठेवतांना ‘त्यावर प्रत्यक्ष गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवले) बसणार आहेत’, हा भाव होता. घर म्हणजे सभागृह आहे, तशी सिद्धता सर्व जण करत होते आणि आनंद अन् चैतन्य यांचा अनुभव घेत होते.’
२. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्ष गुरुदेव घरी आले आहेत’, असे अनुभवणे
‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ‘रामनाथी येथे होत असलेले गुरुपूजन माझ्याच घरी होत आहे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘आसंदीवर प्रत्यक्ष गुरुमाऊली विराजमान झालेली आहे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या त्यांचे पूजन करत आहेत’, असे मला अनुभवता आले. कार्यक्रमातील आरतीच्या वेळेसच आम्ही घरी आरती केली आणि ती म्हणतांना ‘प्रत्यक्ष रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातच आरती करत आहोत आणि सर्व जण त्यामध्ये सहभागी आहेत’, असे सर्वांनी अनुभवले.
३. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत स्वभावदोष निर्मूलनासाठी ध्येय ठेवून प्रयत्न करणे
गुरुपौर्णिमेच्या कालावधीत मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी ध्येय ठेवून प्रयत्न केले. तेव्हा माझ्या लक्षात आलेल्या अहंच्या पैलूंसमवेत इतरांनी माझ्या लक्षात आणून दिलेले पैलू ‘गुरुमाऊलीनेच दाखवले’, या भावाने मला त्यांवर प्रयत्न करता आले. प्रत्येक पैलूची व्याप्ती काढतांना ‘मन रिकामे होत आहे’, असे मला वाटत होते. याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. त्यामुळे या काळात गुरुपौर्णिमेचा दिवस हा ‘परीक्षेचा दिवस’ असल्याप्रमाणे प्रयत्न झाले. ‘गुरुमाऊलीने आपल्यासाठी काय काय केले’, याचे स्मरण होऊन माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते.’
सौ. चित्रा नाकील
१. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, तशा तळमळीने गुरुमाऊलीने प्रयत्न करवून घेणे आणि ६१ टक्के पातळी घोषित होणे
‘गुरुपौर्णिमेनिमित्त देवाने ‘ऑनलाईन’ प्रवचन करण्याची संधी दिली. या कालावधीत नातेवाइकांना संपर्क करणे, समाजात प्रवचने करण्याचे नियोजन करणे इत्यादी सेवांमुळे मला एकही दिवस कंटाळा आला नाही किंवा ‘वेळ जात नाही’, असे वाटले नाही. हे सर्व मला गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने अनुभवता आले. त्याच काळात गुरुमाऊलीच्या कृपेमुळे आम्हाला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी सांगितले, ‘‘परीक्षेत पास होण्याकरता जसा विद्यार्थ्यांना रात्रंदिवस अभ्यास करण्याचा ध्यास लागलेला असतो, तसे प्रयत्न व्हायला हवेत.’’ देवाने माझ्याकडून व्यष्टी साधनेचे तसेच प्रयत्न करून घेतले. गुरुपौर्णिमेच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात अनपेक्षितपणे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित केले. ही माझ्यासाठी गुरुमाऊलींनी दिलेली अनमोल भेट होती.
२. गुरुमाऊलीच्या कृपेने आगळीवेगळी गुरुपौर्णिमा अनुभवता येणे
गुरुपूजनाच्या वेळी आश्रमात (घरी) गुरुमाऊलीचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आगमन झाले, असे सर्वांनी अनुभवले. डोळ्यांसमोर सतत गुरुमाऊली दिसत होती. त्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. ‘तो दिवस संपूच नये’, असे वाटत होते. सेवेमध्ये थोडाही थकवा जाणवला नाही. ही आगळीवेगळी गुरुपौर्णिमा गुरुमाऊलीच्या कृपेने अनुभवता आली. त्याविषयी गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’
कु. अदिती म्हेत्रे
‘अर्पण देण्याचे महत्त्व’ या विषयावरील ध्वनीचित्रफीत पाहून नातेवाइकांनी अर्पण देणे
‘गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये मी ‘अर्पण देण्याचे महत्त्व’ ही ध्वनीचित्रफीत नातेवाइकांना पाठवली. माझ्या बहिणीचा साधनेला विरोध आहे; पण व्हिडिओ पाहून ती म्हणाली, ‘‘सनातन संस्थेला अर्पण दिले, तर त्याचा योग्य वापर होईल. इतर ठिकाणी दिले, तर त्याचा कसा वापर होईल ते ठाऊक नाही’’ आणि तिने अर्पण दिले. अन्य काही नातेवाइकांनीही अर्पण दिले. माझ्या ‘प्रतिमा जपणे’या स्वभावदोषामुळे मी त्यांना अर्पण देण्याविषयी विचारत नव्हते. या माध्यमातून गुरुदेवांनी सेवेची संधी दिल्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |