विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास वगळून हिंदु राजांचा इतिहास शिकवला जाणार !

केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !

आता प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रमातही अशा प्रकारचा पालट करण्यासाठी भाजप शासित राज्यांमध्ये प्रयत्न व्हावा, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली – इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच ‘यु.जी.सी.’ने सिद्ध केला आहे. यामध्ये भारतावर आक्रमणे करणार्‍या आणि येथील अनेक वास्तू उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर अन् त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (वर्ष १२०६ ते १७०७)’ अंतर्गत सांगण्यात येणार्‍या इतिहासामध्ये आता मोगलांऐवजी त्यांच्या विरोधात लढणारे महाराणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदु राजांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आयडिया ऑफ भारत’मध्ये भारतातील राजकीय गोष्टींऐवजी नव्या अभ्यासक्रमामध्ये धार्मिक विषयांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या संकल्पनेवर नवीन प्रस्तावित अभ्यासक्रम असणार आहे. या माध्यमातून पदवीपूर्वी विद्यार्थ्यांना धर्मांच्या संदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राचीन भारतामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंदर्भातील माहितीही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. ‘वैदिक काळातील भारत कसा होता ?’ तसेच वेद आणि उपनिषदे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये पालट करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘इतिहासला धार्मिक आणि जातीयवादी दृष्टीकोनातून पाहिले जात आहे !’ – काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची नाहक टीका

ज्या काँग्रेसला मोगल, टिपू सुलतान यांच्याविषयी प्रेम आहे त्या काँग्रेसला हिंदु राजांचा आणि हिंदु धर्माचा इतिहास शिकवला जाणे चुकीचेच वाटणार !

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना याविषयी ट्वीट करून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इतिहासाला धार्मिक आणि जातीयवादी दृष्टिकोनातून पहाणारे मोदी सरकार भारताची कधीही न भरून येणारी हानी करत आहे. रा.स्व. संघाच्या विचारसरणीतून शिक्षणक्षेत्राचे राजकीय लाभासाठी विकृतीकरण करण्याचा प्रकार नव्या पिढीला घातक आहे. काँग्रेसने देश घडवला, सहिष्णु वैज्ञानिक दृष्टीकोन दिला. भाजप देशाचा तोंडवळा बिघडवत आहे.