जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे १५ धरणे भरली नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील १४ लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणची धरणे आणि कोर्ले-सातांडी मध्यम धरण १०० टक्के भरले आहे. तिलारी-आंतरराज्य धरण ८२.८२ टक्के भरले आहे. या धरणातून सध्या प्रतिसेकंद १७५.४१० घनमीटर इतका पाण्याचा विसर्ग (अतिरिक्त पाणी सोडणे) चालू आहे.

सावंतवाडी– तालुक्यात इन्सुली, सावंतटेंब येथे जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कुडाळ तालुक्यात पावसामुळे माणगाव येथील आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी या परिसरातील गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील खारेपाटण येथील वाघोटन नदी, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदी आणि कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी (भंगसाळ नदी) या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या नद्यांच्या काठी असलेल्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १५ ते १८ जुलै या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.