सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार चालूच

  •  पूरस्थिती कायम

  • जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले ३ दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंगसाळ नदीच्या पुराचा कुडाळ शहरात परिणाम

कुडाळ – येथील भंगसाळ नदीला (कर्ली नदी) १२ जुलैला पूर आल्याने पुराचे पाणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात घुसले होते. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले. गुलमोहर हॉटेल ते काळपनाका या परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. कुडाळ शहरातून कुडाळ रेल्वेस्थानकावर जाणारा रस्ताही पाणी साचल्याने बंद होता. पंचायत समिती आणि नवीन बसस्थानक परिसरांत असलेल्या परप्रांतियांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने हानी झाली. तालुक्यातील माणगावमधील निर्मला, कर्ली, हातेरी आणि पीठढवळ या नद्यांनाही पूर आला आहे. तालुक्यातील चेंदवण मळावाडी, संरबळ भाटीवाडी, कुडाळ आंबेडकरनगर आणि पावशी या पूरग्रस्त भागांना धोक्याची चेतावणी देण्यात आली आहे. या भागावर आपत्कालीन यंत्रणा लक्ष ठेवून असल्याचे तहसीलदार पाठक यांनी सांगितले आहे. अतीवृष्टीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या भातशेतीला मोठा फटका बसला असून भातशेतीची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत.

समुद्राच्या उधाणाचा शिरोडा किनारपट्टीला फटका

वेंगुर्ले – तालुक्यातील तुळस घाटी येथील गोवर्धन मंदिराच्या जवळ असलेल्या वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील बाजूपट्टी खचल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे येथून वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहने हाकावीत, असे आवाहन सरपंच शंकर घारे यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका शिरोडा किनारपट्टीला बसला. येथे किनार्‍यावर असलेली सुरूची झाडे उन्मळून पडत आहेत. अनेक ठिकाणी ही झाडे वीजवाहिन्यांवर पडून विजेचे खांबही पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सावंतवाडी – मुसळधार पावसामुळे मडुरा येथील श्री माऊली मंदिर येथे असलेला पूल पाण्याखाली गेल्याने मडुरा-सातोसे-सातार्डा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या पुलाची उंची वाढवण्याविषयी वारंवार मागणी करूनसुद्धा याकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येत्या २६ जुलैला याच पुलावर उपोषण करण्यात येणार आहे, अशी चेतावणी  श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली. (प्रतिवर्षी पावसात नागरिकांची गैरसोय होत असतांना समस्येकडे दुर्लक्ष करणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ? – संपादक)

आमदार नीतेश राणे यांनी केली करूळ घाटाची पहाणी

नीतेश राणे

वैभववाडी – १२ जुलैला तालुक्यातील करूळ घाटातील रस्त्याचा काही भाग ढासळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी १३ जुलैला घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. ‘अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे करूळ घाट कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे घाटाची परिस्थिती तात्काळ सुधारा, अन्यथा अधिकार्‍यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी आमदार राणे यांनी या वेळी दिली.

आचरा येथे पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांचा घेराव

मालवण – सतत पडणार्‍या पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे आचरा पारवाडीत नदीचे पाणी घुसले. हे पाणी डोंगरेवाडी येथे असलेल्या कोळंबी प्रकल्पामुळे घुसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेले मंडल अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना घेराव घातला. त्यानंतर साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त मालवणकर यांनी ‘याविषयी जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घेणार आहेत, तोपर्यंत घेराव मागे घ्यावा’, अशी विनंती केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.