सातारा, वाई, कराड आणि फलटण शहरांध्ये ऑनलाईन नोंदणी करणार्‍यांना लस मिळणार

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा – जिल्ह्यातील संपूर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबद्ध लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तरावरून योग्य नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे सातारा, वाई, कराड आणि फलटण या केवळ शहरी भागांतील कोरोना लसीकरण सत्र यापुढे १०० प्रतिशत ऑनलाईन नोंदणीनुसारच घेण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर आरोग्य विभागाने उपाययोजना चालू केल्या आहेत. त्यातील एक टप्पा म्हणजे लसीकरण होय. जिल्ह्यात १० जुलैपर्यंत ७ लाख ७३ सहस्र ७६८ एवढ्या नागरिकांनी पहिला डोस घेतला असून २ लाख ८ सहस्र ५०५ एवढ्या नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार प्रतिदिन दुपारी १२ वाजता शासनाच्या https://selfregistration.cowin.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लसीकरण सत्र प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे यापुढे सातारा, वाई, कराड आणि फलटण येथील शहरी भागांतील नागरिकांना ‘ऑन द स्पॉट’ पद्धतीने लसीकरण करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.