१. गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ सोहळा पहातांना ‘अमेरिकेतील सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी प्रार्थना होणे आणि हे विचार एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांच्याकडून प्रक्षेपित होत असल्याचे देवाने सुचवणे
‘४.७.२०२० या दिवशी मला गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ सोहळा पहाण्याची संधी मिळाली. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांनी गुरुपूजन केले. हा सोहळा पहात असतांना माझ्या मनात ‘अमेरिकेतील सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी आतून प्रार्थना होऊ लागली. ही प्रार्थना अतिशय भावपूर्ण होत होती. ‘साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीचा विचार माझ्या मनात कुठून येत आहे ?’, याचे चिंतन केल्यावर देवाने मला सुचवले की, हे विचार पू. भावनाताईंकडून प्रक्षेपित होत आहेत. मला ही अनुभूती देऊन ‘संतांच्या मनात कसे सतत साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीचेच विचार असतात आणि ते किती भावपूर्ण प्रार्थना करतात ?’, हे काही अंशी अनुभवण्यास दिल्यामुळे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणकमली आणि पू. (सौ.) भावनाताई यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.
२. मुलासाठी घावन करत असतांना देवाला सतत प्रार्थना होणे आणि घावन झाल्यावर त्यावर ॐ उमटलेला दिसणे
मे २०२० मध्ये एके दिवशी माझा मुलगा अद्वैत (वय १ वर्षे ४ मास) व्यवस्थित जेवत नव्हता. तेव्हा परात्पर गुरुदेवांना मी आत्मनिवेदन करत होते की, ‘मी अद्वैतसाठी काय बनवू ?’ त्या वेळी ‘घावन बनव’, असे उत्तर आले. घावन बनवत असतांना माझ्याकडून ‘तो मला भावपूर्ण बनवता येऊ देत’, अशी सतत प्रार्थना होत होती. देवाला मी हेही सांगत होते की, ‘देवा, अद्वैतला घावन आवडेल कि नाही, हे मला ठाऊक नाही; मात्र तुला हा घावन आवडू दे.’ तव्यावर घावन बनवत असतांना मला त्यावर ॐ उमटलेला दिसला. ते पाहून मला पुष्कळ आनंद झाला आणि ‘हा घावन देवाने स्वीकारला’, असे वाटून कृतज्ञताही वाटली. मला ही अनुभूती आल्यामुळे आणि ‘अमेरिकेतही तुम्ही माझ्या समवेत आहात’, याची मला जाणीव करून दिल्यामुळे मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्राजक्ता पिंपरकर, लुईसव्हिले, केंटकी, अमेरिका. (१०.७.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |