पुण्यात महिला पोलीस अधिकार्‍याला मारहाण करणार्‍याविरुद्ध तक्रार प्रविष्ट

महिला पोलीस उपनिरीक्षकांशी अशा प्रकारे वागणारी व्यक्ती अन्य वेळी इतरांशी कशी वागत असेल, याचा विचारच न केलेला बरा !

पुणे – येथील शहर पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षकांना सिद्धांत जावळे याने मारहाण केली. आरोपी पीडितेचा मित्र होता, तसेच त्याने त्याच्यासोबत विवाह न केल्यास महिलेचे व्हिडिओ, छायाचित्रे सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. त्याने पैशांचीही मागणी केली होती. मागील वर्षभरापासून आरोपी महिलेला त्रास देत होता. त्याच कालावधीत आरोपीने पीडित महिलेकडून अनेक वेळा पैसेही घेतले आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिला अधिकार्‍याने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी आणि पीडित महिला अधिकारी हे दोघे मित्र होते. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर काही दिवसांनी आरोपीने महिलेवर सतत संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाण करायला आरंभ केला. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने विवाह करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या नातेवाइकांनाही भ्रमणभाष करून ‘माझा तिच्याशी विवाह लावून द्या, अन्यथा मी आत्महत्या करीन. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार प्रविष्ट करीन’, अशी धमकी दिली होती. (ॲट्रॉसिटी कायद्याला पाठिंबा देणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? यावरून ॲट्रॉसिटी कायद्याचा कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो, हेच यातून दिसून येतो. अशांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)