१. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘ऑक्टोबर २०२० च्या आरंभी मला सकाळी शौचाला जाऊन आल्यावर पुष्कळ थकवा येत होता. मला पुष्कळ थकवा येऊ लागल्याने १३.१०.२०२० या दिवशी माझ्या रक्ताची चाचणी केली. १४.१०.२०२० या दिवशी माझ्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल आला. त्यात ‘माझे रक्तातील ‘हिमोग्लोबिन’ ५.१, ‘प्लेटलेट्स’ ७० सहस्र आणि ‘B 12’ चे प्रमाण उणे असल्याचे समजले. (सर्वसाधारण व्यक्तीत ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण पुरुष असेल, तर १३ ते १५ आणि स्त्री असेल, तर १२ ते १४ असते अन् ‘प्लेटलेट्स’चे प्रमाण १.५० लाख ते ४ लाखांपर्यंत असते.)
आ. ‘१३ आणि १४.१०.२०२० या दिवसांत मी सकाळी प्राणशक्तिवहन पद्धतीनुसार नामजप शोधून काढला की, थकवा उणावायचा आणि संध्याकाळी सेवा पूर्ण झाल्यावर परत थकवा यायचा’, असे माझ्या लक्षात आले.
इ. देवद आश्रमातील आधुनिक वैद्यांनी हे सर्व अहवाल रामनाथी आश्रमातील संबंधित वैद्यांना दाखवले. त्यांनी मला पुणे येथील नवले रुग्णालयात पुढील चाचण्या करण्यासाठी पाठवायचे ठरवले.
२. नवले रुग्णालयात गेल्यावर जाणवलेली सूत्रे
२ अ. नवले रुग्णालयात भरती करून घेणे : १५.१०.२०२० या दिवशी मी एका साधकाच्या समवेत सकाळी ९.३० वाजता नवले रुग्णालयात पोचलो. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या पुणे येथील आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी तेथील ‘मेडिसिन’ विभागात आधीच सांगून ठेवल्याने आधुनिक वैद्यांनी मला त्वरित तपासले. त्यांनी मला वेगवेगळ्या चाचण्या करायला सांगितल्या आणि मला रुग्णालयात भरती करून घेतले.
२ आ. १६.१०.२०२० या दिवशी माझ्या चाचण्यांचे अहवाल आले. त्यामध्ये माझे ‘हिमोग्लोबिन’ ४.२ आणि ‘प्लेटलेट्स’ ४० सहस्र एवढेच आले होते, तसेच ‘मला मूळव्याधीचा त्रास आहे’, हे लक्षात आले.
२ इ. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना घेत असलेल्या आयुर्वेदाच्या औषधांविषयी सांगितल्यावर त्यांनी आयुर्वेदाच्या औषधांमधून पोटात काही धातू गेले असण्याची आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन रक्त उणावले असण्याची शक्यता असल्याचे सांगणे : मला अशा प्रकारचा त्रास वर्ष २००८ आणि वर्ष २०१५ मध्ये झाला होता. तेव्हा माझ्या व्याधींसंदर्भात आधुनिक वैद्यांनी विचारले असता त्यांना मी घेत असलेल्या आयुर्वेदाच्या औषधांविषयी सांगितले. मी सांगितले, ‘‘वर्ष २०१२ मध्ये माझी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ३ वर्षांनी मी ‘इकोस्प्रीन’ या औषधाला पर्याय म्हणून पू. भावेकाकांनी (सनातन संस्थेनुसार साधना करणारे आयुर्वेदिक वैद्य) सांगितल्यानुसार ‘नित्यानंद रस’ हे आयुर्वेदाचे औषध घेत होतो, तसेच एका महाविद्यालयातून माझे वजन न्यून करण्याच्या दृष्टीने आयुर्वेदाचे उपचार घेत होतो. त्यामध्ये ‘आरोग्यवर्धिनी’ हे औषध घेत होतो.’’
तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही घेत असलेल्या आयुर्वेदाच्या औषधांमधून तुमच्या पोटात काही धातू गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन तुमचे रक्त उणावले असण्याची शक्यता आहे.’’
२ ई. आधुनिक वैद्यांनी ३ बाटल्या रक्त देण्यास सांगणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या पोटाची, तसेच आतड्याची ‘इंडोस्कोपी’ करणे आणि ‘रक्तात धातूचे प्रमाण किती आहे ?’, हे बघण्यासाठी एक विशेष चाचणी करायला सांगितली. ही चाचणी करण्यासाठी ७ सहस्र रुपये लागणार होते. माझी अशी चाचणी करण्यासाठी माझ्या शरिरातील रक्तात वाढ होणे आवश्यक होते; म्हणून त्यांनी मला ३ बाटल्या रक्त देण्यास सांगितले.
२ उ. रक्त देतांना आलेल्या अडचणी : १८, १९ आणि २०.१०.२०२० या दिवशी मला रक्त दिले. तेव्हा अडचणी आल्या.
१. १८.१०.२०२० या दिवशी मला रक्त देण्यासाठी माझी नस सापडत नव्हती. माझ्या शरिरात जवळजवळ ४ – ५ ठिकाणी सुई खुपसल्यावर मला रक्त देता आले.
२. माझ्या समवेत ज्या रुग्णांना रक्त दिले होते, त्यांना रक्त देण्यासाठी ३ ते ३.३० घंटे एवढा वेळ लागला; पण मला रक्त देतांना रक्ताचा प्रवाह थांबतच होता. शेवटी ‘इंजेक्शन’ने पंप करून माझ्या शिरेत रक्त ढकलावे लागले. तेव्हा पहिल्या दिवशी मला एका बाटलीतील रक्त देण्यासाठी ५ – ६ घंटे लागले.
३. सर्व चाचण्या झाल्यानंतर माझे सर्व अहवाल सर्वसामान्य आले आणि माझे हिमोग्लोबिन अल्प होण्याचे कोणतेही कारण सापडले नाही. रक्तातील धातू परीक्षा अहवाल येईपर्यंत मला थांबवून न ठेवता आधुनिक वैद्यांनी मला रुग्णालयातून सोडले.
३. अनुभूती
३ अ. देवाच्या कृपेने संकट निवारण मंत्र सातत्याने म्हटला जाणे : पुण्याच्या प्रवासात माझ्याकडून आपोआप परात्पर गुरु पांडे महाराज नेहमी सांगत असलेला संकट निवारण मंत्र – ‘ॐ शरणागत दीनार्त परित्राण परायणे । सर्वस्यार्ति हरे देवी नारायणि नमोस्तुते ।। ’- हा जप सातत्याने होत होता.
‘रुग्णालयात माझ्या सर्व चाचण्या चालू असतांनाही माझा हा मंत्रजप सतत चालू होता’, असे माझ्या लक्षात आले. त्यासाठी माझे काहीही विशेष प्रयत्न होत नव्हते. देवाच्या कृपेने माझा हा जप चालू झाला होता.
३ आ. १९ आणि २०.१०.२०२० या दिवशी रक्त देतांना नस लगेच मिळणे आणि २ ते अडीच घंट्यांत रक्त चढवून पूर्ण होणे : १८.१०.२०२० या दिवशी मला रक्त चढवतांना पुष्कळ अडथळे येत होते. तेव्हा मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना याविषयी सांगितले. त्यांनी मला रक्त चढवण्यात अडथळा येऊ नये; म्हणून नामजप करायला सांगितला. मी तो नामजप केला. दुसर्या आणि तिसर्या दिवशी देवाच्या कृपेने भावसत्संगाच्या वेळी मला रक्त चढवण्यास चालू केले आणि भावसत्संग संपताना २ ते अडीच घंट्यांत रक्त चढवणे पूर्ण झाले. रक्त चढवण्यासाठी माझी नसही लगेच मिळाली. तेव्हा ‘पहिल्या दिवशी रक्त चढवतांना मला झालेला त्रास आध्यात्मिक होता’, असे मला वाटले.
३ इ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या संकल्पाने पपईच्या पानांचा रस वेळेत मिळून ‘प्लेटलेट्स’ वाढणे आणि ‘इंडोस्कोपी’ चाचणी होण्याचा मार्ग मोकळा होणे : मला रक्त चढवल्यानंतर माझ्या रक्ताची चाचणी केली असता रक्तातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण वाढलेले आढळले; पण ‘प्लेटलेट्स’ वाढल्या नव्हत्या. त्या वेळी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष केला. त्यांनी पपईच्या पानांचा रस घ्यायला सांगितला. त्यानंतर पुणे येथील साधकांना ‘पपईच्या पानांचा रस मिळू शकेल का ?’, असे विचारले असता त्यांच्याकडून अर्ध्या घंट्यात आम्हाला पपईच्या पानांचा रस मिळाला. मी हा रस प्यायल्यावर माझ्या ‘प्लेटलेट्स’ १ लक्ष ३० सहस्र एवढ्या झाल्या. (१६.१०.२०२० या दिवशी माझ्या ‘प्लेटलेट्स’ ४० सहस्र एवढ्याच होत्या.) सद्गुरु गाडगीळकाकांच्या संकल्पाने आम्हाला पपईच्या पानांचा रस वेळेत मिळून माझ्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ वाढल्या. त्यामुळे माझी ‘इंडोस्कोपी’ होण्याचा मार्ग मोकळा झाला.
३ ई. ‘इंडोस्कोपी’ करतांना प्रथम भीती वाटणे आणि नंतर मंत्रजप केल्यावर कोणत्याही प्रकारे त्रास न होता ‘इंडोस्कोपी’चा अहवाल सर्वसामान्य येणे : २२.१०.२०२० या दिवशी ‘इंडोस्कोपी’ करतांना त्यासाठी वापरण्यात येणारा मोठा पाईप बघून मला थोडी भीती वाटली. त्या वेळी मी ‘ॐ शूं शूलधारिणीभ्याम् नमः ।’ आणि ‘ॐ कां कालरात्रीभ्याम् नमः’ । (दुर्गासप्तशतीमधील देवीकवचमधील पोटाच्या व्याधी दूर करणार्या देवतांची नावे) हे जप १०८ वेळा केले. त्यानंतर माझी भीती न्यून होऊन ‘इंडोस्कोपी’ करतांना मला कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही, तसेच माझा ‘इंडोस्कोपी’चा अहवालही सर्वसामान्य आला.
३ उ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलतांना ‘प्रत्यक्ष देवीशी बोलत आहे’, असे वाटणे : २१.१०.२०२० या दिवशी ललिता पंचमी होती. त्या दिवशी दुपारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मला भ्रमणभाष आला. तेव्हा मला ‘प्रत्यक्ष देवीशी बोलत आहे’, असे वाटले. त्यांच्या बोलण्यातून सतत आनंद प्रक्षेपित होत होता. त्याचा मला लाभ झाला. ‘देव माझ्यासाठी किती करतो !’, याची जाणीव होऊन माझा कृतज्ञतेचा भाव सतत जागृत होत होता.’
४. कृतज्ञता
४ अ. वैद्यकीय उपचार तातडीने आणि वेळेत मिळणे : प्रत्येक आधुनिक वैद्य माझ्याकडे काळजीपूर्वक लक्ष देत होते, तसेच माझ्यावर तातडीने आणि वेळेत उपचार होत होते.
४ आ. सनातनच्या साधकांच्या योग्य आचरणामुळे समाजातील व्यक्ती अन्य साधकांना आत्मीयतेने वागवत असणे : ‘तेथे सेवा करणार्या सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या ज्योती काळे यांची प्रतिमा अन्य आधुनिक वैद्यांमध्ये चांगली असल्याने, त्याच्या परिणामस्वरूप मला चांगली वागणूक मिळाली’, असे मला जाणवले.
‘सनातनच्या साधकांच्या योग्य आचरणामुळे समाजातील व्यक्ती अन्य साधकांना आत्मीयतेने वागवतात’, हे लक्षात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
४ इ. रज-तमात्मक वातावरणातही देवाने आमच्या भोवती जणूकाही संरक्षककवच निर्माण केल्याचे जाणवणे : रुग्णालयात असतांना ‘मी आश्रमातच रहात आहे’, अशी अनुभूती मला आली. मला दुपारच्या वेळी ‘ऑनलाईन’ विशेष भावसत्संग ऐकायला मिळत होता. ‘सभोवतालचे वातावरण रज-तमात्मक असूनही देवाने आमच्या भोवती जणू काही संरक्षककवच निर्माण केले असून आम्हाला सत्च्या वातावरणात ठेवले आहे’, असे मला जाणवले.
४ ई. साधकांनी प्रसाद-महाप्रसाद यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे करणे : पुणे येथील साधकांनी आमची प्रसाद-महाप्रसाद यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली होती. त्यामुळे त्यांचा निरोप घेतांना माझा भाव पुष्कळ जागृत झाला. ‘आपल्या नातेवाइकांनीही एवढी काळजी घेतली नसती’, याची मला जाणीव झाली. मी सर्व साधकांचा कृतज्ञ आहे.
४ उ. संतांचा सत्संग मिळणे : २५.१०.२०२० या दिवशी दसरा होता. या दिवशी मला रुग्णालयातून परत पाठवले. त्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला. त्या वेळी माझे पू. नीलेश सिंगबाळ यांच्याशीही बोलणे झाले. त्याविषयी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
४ ऊ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले मंत्रजप, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेले नामजपादी उपाय यांनी त्रास नाहीसा होणे : आता माझी शारीरिक स्थिती चांगली असून मी आश्रमात सेवा करू शकतो. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले मंत्रजप, सद्गुरु गाडगीळकाका आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने मी या मोठ्या अनिष्ट शक्तींनी केलेल्या आक्रमणातून सुखरूप बाहेर पडलो’, असे मला वाटले. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (पू.) श्री. रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |