‘कोरोना’ या वैश्विक महामारीच्या संकटामुळे दळणवळण बंदी असतांनाही या वर्षीची गुरुपौर्णिमा सर्व साधकांना आनंद आणि चैतन्य देणारी होती. या वर्षी साधकांना अनेक अनुभूती आल्या. केरळमधील सर्वच साधक तळमळीने, झोकून देऊन आणि संघभावाने सेवा करत होते. तेव्हा ‘देव सेवा करवून घेत आहे’, असे जाणवले.’ सर्वच साधक कृतज्ञताभावाने गुरुपौर्णिमा महोत्सव अनुभवत होते.
कु. रश्मि परमेश्वरन्
१. समाजातील व्यक्ती आणि धर्मप्रेमी साधना करण्यासाठी सकारात्मक झाल्याचे लक्षात येणे
‘या वर्षी गुरुपौर्णिमेचा प्रसार भ्रमणभाषद्वारे आणि ‘ऑनलाईन’ केला होता. तेव्हा ‘अनेक नातेवाइक आणि धर्मप्रेमी साधना करण्यासाठी सकारात्मक झाले आहेत’, असे जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले आपत्काळाविषयी जे सांगत आहेत, ते सर्व सत्य असल्याचे समाजातील लोक सांगत आहेत.
२. अनेक तांत्रिक अडचणी येऊनही संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अडचणी दूर होऊन कार्यक्रम पहाता येणे
‘या वेळी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ असल्यामुळे ध्वनीचित्रीकरण, संकलन अशा अनेक सेवा होत्या. एका कार्यक्रमाचे चित्रीकरण केलेला ‘व्हिडिओ’ दाखवतांना अनेक तांत्रिक अडचणी आल्या; म्हणून रामनाथी आश्रमात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना संपर्क केला. नंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केले, तसेच ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्या श्रीमती सौदामिनी कैमलआजींना नामजप करायला सांगितला. त्यानंतर तांत्रिक अडचणी दूर होऊन ‘व्हिडिओ’ ‘अपलोड’ होऊ शकला. यातून संतांच्या सामर्थ्याची प्रचीती आली. आम्ही ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम केवळ त्यांच्याच कृपेने पाहू शकलो आणि वाईट शक्तींचे सूक्ष्म युद्ध कसे असते?’, हेही लक्षात आले. मला गुरुदेव आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
संतांनी सेवेमध्ये येणार्या अडचणींवर उपाय म्हणून सौदामिनी कैमलआजींना नामजप करायला सांगितला होता. त्या ७८ वर्षांच्या असून त्यांची शारीरिक स्थितीही चांगली नाही, तरीही त्यांनी ५ घंटे नामजप पूर्ण केला. यातून त्यांची तळमळ दिसून येते.’
३. परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे
‘गुरुपूजन झाल्यावर आरती चालू झाली. तेव्हा ‘साक्षात् परात्पर गुरुदेव त्या खोलीत सूक्ष्मातून आले आहेत आणि सर्व साधकांकडे पहात आहेत, तसेच ‘ते सर्वांना पुढील आपत्काळासाठी चैतन्य प्रदान करत आहेत’, असे मला जाणवले. ‘ते सूक्ष्मातून सर्व ठिकाणच्या साधकांकडे जात आहेत’, असे वाटून माझी भावजागृती झाली.’
श्री. बालकृष्ण
गुरुदेवांचे अस्तित्व सूक्ष्मातून जाणवणे
‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला सकाळपासून गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व सूक्ष्मातून जाणवत होते. एकदा ‘ते समवेत आहेत’, असे वाटून मला त्यांचे चरण दिसले. त्यामुळे भावजागृतीही झाली. असे मला प्रथमच जाणवले आणि मी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा अनुभवली.’
सौ. सुमा पुथलत
एक ‘व्हिडिओ’ ‘अपलोड’ करतांना अनेक अडथळे येणे आणि नामजपादी उपाय पूर्ण झाल्यानंतर ‘त्रासही अल्प झाला आहे’, असे सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगणे
‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक ‘व्हिडिओ’ ‘अपलोड’ करतांना अनेक अडथळे येत होते. त्या वेळी रामनाथी आश्रमातून नामजपादी उपाय करायला सांगितले होते. संत नामजप करत होते. नंतर मी एका सेवेसाठी स्वयंपाकघरात गेले. त्या वेळी ‘माझ्या हाताला कुणीतरी टोचत आहे’, असे मला जाणवले आणि हातही पटकन बाजूला सरकला गेला. तेवढ्यात ‘व्हिडिओ’ ‘अपलोड’ झाला आहे आणि त्रासही अल्प झाला आहे’, असे सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले. तेव्हा ‘वाईट शक्ती सोडून जातांना मला टोचून जात आहे’, असा विचार माझ्या मनात आला.’
श्रीमती सौदामिनी कैमल
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी लक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवणे
सकाळी गुरुपूजनानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘धर्मकार्यासाठी अर्पण मिळवणे, ही समष्टी साधना !’ या ग्रंथाचे प्रकाशन केले. तेव्हा ‘साक्षात् लक्ष्मीदेवीच ते प्रकाशन करत आहे आणि त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. ते पाहून मला पुष्कळ आनंद वाटला आणि माझी भावजागृती झाली.’ (१०.७.२०२०)
श्री. साईदीपक, केरळ
१. वास्तूमध्ये परात्पर गुरुदेवांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे आणि त्यांच्या संरक्षककवचात असल्याचे जाणवून भावजागृती होणे
‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात कृतज्ञतागीत लावले असतांना माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना होत होती. मला अकस्मात् वास्तूत त्यांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवले. ते माझ्याकडे पहात स्मितहास्य करत होते. नंतर त्यांनी माझा मुलगा आणि पत्नी यांच्याकडे पाहिले. त्यानंतर ते माझे आजारी सासरे झोपले होते, तेथे गेले आणि मला म्हणाले, ‘ते त्यांचे प्रारब्ध भोगत आहेत.’ त्यानंतर त्यांच्या चरणांनी मला आणि पूर्ण घराला सामावून घेतले असल्याचे जाणवले. ‘आम्ही त्यांच्या संरक्षक कवचात आहोत’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.
२. परात्पर गुरु डॉक्टर मला ‘तुला सेवा करणे कठीण आहे’, हे मला समजते; म्हणून मीच त्या सेवा करत आहे. तुझे प्रयत्नही मला दिसत आहेत’, असे म्हणत आहेत’, असे मला जाणवले.
३. मी सेवेसाठी वापरत असलेल्या ‘टॅब’च्या कळा (कीज्) मऊ झाल्या आहेत. त्यामुळे ‘कळफलक (कीबोर्ड) भावपूर्ण हाताळायची ते मला जाणीव करून देत आहेत’, असे जाणवते.
४. घरात गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत असतांना पक्ष्यांचाही मंजुळ स्वर ऐकू येणे आणि त्यातून केरळमध्ये प्रसारकार्य वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळणे
गुरुपूजनाच्या वेळी गुरुदेवांचे अस्तित्व घरात जाणवत होते. तेव्हा सज्ज्यात पक्ष्यांचा मंजुळ स्वर ऐकू येत होता. ‘जणू त्यांनाही ईश्वरी चैतन्य जाणवत आहे आणि सात्त्विकता अन् गुरुदेवांचे अस्तित्व हवे आहे’, असे माझ्या लक्षात आले. मला केरळमध्ये प्रसारकार्य वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.’ (१०.७.२०२०)
|