राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढणार्‍या अधिवक्त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

  • ‘हिंदु इकोसिस्टम’च्या वतीने ‘संविधान के रक्षक’ पुरस्काराचे वितरण

  • हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अश्‍वनी दुबे यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार !

  • अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांना ‘श्यामाप्रसाद मुखर्जी’ पुरस्कार प्रदान !

डावीकडून अधिवक्ता अश्वनी दुबे, श्री. कपिल मिश्रा. पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, अधिवक्ता अश्विनी उपाध्याय आणि पुरस्कार स्वीकारताना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

नवी देहली, ६ जुलै (वार्ता.) – ‘संविधान के रक्षक’ हा पुरस्कार श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त दिला जात आहे. मुखर्जी यांनी ‘एक देश, एक निशाण आणि एक संविधान’ची संकल्पना मांडली. त्यासाठी लढत त्यांनी प्राणत्यागही केला. आज ‘हिंदु इकोसिस्टम’ या संघटनेने राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढणार्‍या अधिवक्त्यांचा सन्मान करण्याची संधी मला दिली. त्यांच्या कार्याविषयी मला अवगत होता आले, हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले. येथे सिंह यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये ‘हिंदु इकोसिस्टम’च्या वतीने राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी उल्लेखनीय कार्य करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता अश्‍वनी दुबे यांना ‘संविधान के रक्षक’ हा पुरस्कार देण्यात आला. तसेच अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांना ‘श्यामाप्रसाद मुखर्जी ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान करतांना केंद्रीय मंत्री सिंह यांनी वरील विचार मांडले.

या कार्यक्रमाला भाजपचे नेते आणि ‘हिंदु इकोसिस्टम’चे अध्यक्ष कपिल मिश्रा, तसेच राजेश गोयल; मुंबई येथील धर्मप्रेमी व्यावसायिक दिनेश मेहता; हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सनातन संस्थेच्या देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री उपस्थित होत्या. अधिवक्त्या मोनिका अरोडा यांनाही ‘संविधान के रक्षक’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता; मात्र त्या काही कारणामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने श्री. मिश्रा यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

  • कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी मांडलेले विचार !  

  • ‘हिंदु इकोसिस्टम’ने वैचारिक आतंकवादाला पराभूत करावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

शहरी नक्षलवादी फादर स्टेन स्वामी यांच्या प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये हिंदू जे काही सहन करीत आहेत, तो वैचारिक आतंकवादाचा परिणाम आहे. साम्यवादी विचारसरणीच्या ८-१० जणांनी पुरस्कार परत केले आणि असे वातावरण निर्माण केले की, गांधीहत्येनंतर देशात शांतता होती अन् दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येनंतर वातावरण बिघडले. हे लोक नक्षलवाद्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या १४ सहस्र हत्यांविषयी बोलत नाहीत. आपण आपल्या मनाची संवेदनशीलता घालवून बसल्याने नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्यांच्या बातम्या वाचूनही आपल्याला काही वाटत नाही. आता आपल्याला वैचारिक लढा देऊन हे थांबवले पाहिजे, असे आवाहन हिंदु विधीक्ष परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी येथे केले.

‘हिंदु इकोसिस्टम’ने जनहित याचिका प्रविष्ट करण्यासारखे कार्य करावे ! – अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

सर्वोच्च न्यायालयात १०० हून अधिक जनहित याचिका प्रविष्ट करणारे अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय म्हणाले की, जनहित याचिकांमध्ये अनेकांनी सहभाग घ्यायला हवा.  एखाद्या याचिकेमध्ये माझ्यासमवेत अन्यही अधिवक्ते उभे राहिल्यास त्याचा नक्कीच लाभ होईल. ‘हिंदु इकोसिस्टम’ने अशा पद्धतीचे कार्य करावे. सध्या मी खासगी व्यवसाय करत नाही. त्यामुळे पुरस्कार आणि त्याच्यासमवेत मिळालेली रक्कम या दोन्ही गोष्टी माझे मनोबल उंचावणार्‍या आहेत.

फादर स्टेन स्वामी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यातील आरोपी होते, हे विसरू नका !- अधिवक्ता अश्‍वनी दुबे

सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता अश्‍वनी दुबे म्हणाले, ‘‘हिंदु इकोसिस्टम’च्या माध्यमातून भाजपचे नेते कपिल मिश्रा जे कार्य उभे करत आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मी त्यांच्यासमवेत या कार्यात प्रारंभापासून आहे. फादर स्टेन स्वामी यांचे कारागृहात झालेले निधन म्हणजे ‘त्यांची न्यायालयाने केलेली हत्या आहे’, अशा स्वरूपाचे आरोप केले जात आहेत. ते चुकीचे आहेत. मुळात फादर स्टेन स्वामी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आले होते. याचे गांभीर्य आपण लक्षात घेतले पाहिजे.

‘हिंदु इकोसिस्टम’ संस्थेचा उद्देश !

‘धर्मनिष्ठ आणि राष्ट्रवादी विचारांचे लेखक, ब्लॉगर, अधिवक्ता, व्यावसायिक आदी सर्वांचे देशव्यापी संघटन व्हावे आणि त्यातून सनातन धर्माचे रक्षण व्हावे, हा ‘हिंदु इकोसिस्टम’चा उद्देश आहे. गेल्या काही मासांतच ‘हिंदु इकोसिस्टम’चे १० लाखांहून अधिक सदस्य झाले आहेत.