शाळांना मूल्यमापनाच्या गुणांची नोंद करण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते का ? हे विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळणे आहे ? शाळा प्रशासनामध्ये संवेदनशीलता का नाही ? उत्तरदायींची चौकशी करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
पुणे – कोरोना संसर्गामुळे या वर्षी दहावीची परीक्षा रहित केली आहे. अंतर्गत मूल्यमापन करून दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्याची मूल्यमापन पद्धती निश्चित केली असून त्यासाठीचे प्रशिक्षणही शिक्षकांना दिले होते; मात्र शाळांना उपलब्ध करून दिलेल्या संगणकीय प्रणालीत विद्यार्थीनिहाय गुणांची नोंदणी करतांना शाळास्तरावर अनेक त्रुटी राहिल्याचे राज्य मंडळाच्या निदर्शनास आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रक काढून दिली. संगणकीय प्रणालीत दिलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांचे गुण भरले नसणे, विद्यार्थीनिहाय गुण निश्चित केलेले नसणे, श्रेणीची नोंद नसणे, पाचवी ते नववीची टक्केवारी भरलेली नसणे अशा स्वरूपाच्या विविध त्रुटी शाळा स्तरावर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. संगणकीय प्रणालीत गुण भरतांना अडचणी आलेल्या शाळांनी ५ ते ९ जुलै या कालावधीत विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.