कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या पडताळणीसाठी गोव्यात १५ दिवसांत प्रयोगशाळा उभारा अन्यथा आंदोलन छेडू ! – काँग्रेस

गिरीश चोडणकर

पणजी, ४ जुलै (वार्ता.) – गोव्यात प्रवेश करणार्‍यांची केवळ ‘ॲन्टीजेन’ चाचणी करण्यात येते. कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू शेजारील कोकण, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत पोचला आहे. कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू केवळ ‘जिनोम सिक्वेन्सिंग’द्वारेच ओळखता येतो. यासाठी गोवा शासनाने कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या पडताळणीसाठी गोव्यात पुढील १५ दिवसांत ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ प्रयोगशाळा उभारावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे गिरीश चोडणकर यांनी दिली आहे.

गिरीश चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत असंवेदनशील भाजप शासनामुळे ३ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांनी प्राण गमावला. गोवा शासनाची कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी कोणतीच सिद्धता नाही. सध्या गोव्यातून कोरोनाविषयक चाचणीचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात येतात; मात्र त्यांचा अहवाल मिळण्यास पुष्कळ विलंब लागत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने १ वर्षापूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उभारण्याचा सल्ला देऊनही गोवा शासनाने याकडे दुर्लक्ष केले. आता १५ दिवसांत प्रयोगशाळा स्थापन न केल्यास शासनाला आंदोलनाला सामोरे जावे लागेल.’’ (शासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ? याविषयी जनतेला माहिती मिळणे आवश्यक आहे ! – संपादक)