सांकवाळ कोमुनिदादच्या भूमीतील अतिक्रमणे आणि भूमीसंबंधी गैरव्यवहार उघडकीस आणल्यामुळे आक्रमण झाल्याची शक्यता
यावरून अतिक्रमण करणारे आणि भूमीसंबंधी गैरव्यवहार करणारे बांधकाम व्यावसायिक किती गुंड प्रवृत्तीचे असतात, ते दिसून येते. राज्यात अशा अराजकसदृश घटना पुन्हा न घडण्यासाठी शासनाने संबंधितांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे !
पणजी, ३ जुलै (वार्ता.) – सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर सांकवाळ पंचायतीसमोर ३ जुलै या दिवशी दुपारी लोखंडी सळ्या आणि नळ्या यांच्या साहाय्याने जीवघेणे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात नारायण नाईक यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारार्थ गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
नारायण नाईक काही कामाच्या निमित्ताने दुपारी सांकवाळ पंचायतीमध्ये गेले होते. या वेळी दुपारी सुमारे १२ वाजता नारायण नाईक गाडीतून उतरतांना त्यांच्यावर पाऊस नसतांनाही रेनकोट घालून आलेले, तसेच चेहरा पूर्णपणे झाकून आलेल्या दोघांनी लोखंडी सळी आणि नळी यांच्या साहाय्याने डोक्यावर आणि पायावर मारहाण करण्यास प्रारंभ केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही जणांनी आक्रमण करणार्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याने ते तेथून पसार झाले. नारायण नाईक हे भाजपच्या दक्षिण गोवा विभागाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक यांचे बंधू होत. नारायण नाईक यांनी माहिती अधिकाराचा वापर करून सांकवाळ कोमुनिदादच्या भूमीतील अतिक्रमणे आणि बांधकाम व्यावसायिक यांचा भूमीसंबंधी गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.