कोल्हापूर, २ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलाव सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. रंकाळा तलावासाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो; मात्र तो कुठे जातो हे कळत नाही. रंकाळा तलावाकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. तलावाच्या परिसरात मद्यपी मोठ्या प्रमाणात असतात. तलावाच्या भोवती मोठ्या प्रमाणात काचेच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा पडलेला असतो. यामुळे रंकाळ्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. तरी कोल्हापूर महापालिकेने रंकाळा तलावाची योग्य निगा राखून स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २ जुलै या दिवशी कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. (सर्व यंत्रणा हाताशी असणार्या महापालिका प्रशासनास रंकाळा तलावाची ही दुरावस्था का दिसत नाही ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? नागरिकांच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काय करतात ? आतातरी हिंदुत्वनिष्ठांनी लक्षात आणून दिल्यावर महापालिका प्रशासनाने योग्य ती कृती करावे असेच सामान्य नागरिकांना वाटते ! – संपादक)
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, ज्येष्ठ नागरिक दिनकर यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख श्री. राजू सांगावकर, श्री. गणेश मेस्त्री उपस्थित होते.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. या तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळले जाते. कचर्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साचून असतात. ‘ओपन जीम’चे साहित्य मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. परिसरात गवत वाढल्याने साप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जातात.
२. बाल उद्यानातील लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य खराब झाले आहे. रंकाळा तलाव परिसर हा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यासाठी राहिला नसून येथे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. रंकाळा तलावाची ही अवस्था गेले अनेक मास अशीच आहे. ‘रंकाळा तलाव शेवटच्या घटका मोजत आहे’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.