‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करणार !

ड्रोन आक्रमणांनंतर सैन्याचा निर्णय !

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत

नवी देहली – आम्ही ‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करत आहोत, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. जम्मूमध्ये सैन्यदल आणि वायूदल यांच्या तळांवर आतंकवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमांतून आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे रावत यांनी सांगितले.

१. जनरल रावत म्हणाले की, एअर डिफेन्स कमांडचे दायित्व वायूदलाच्या तळांचे संरक्षण करण्याचे असणार आहे. हे कमांड लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांच्याकडे लक्ष ठेवील. १५ ऑगस्टपासून एअर डिफेन्स कमांड कार्यरत होईल. याचे नेतृत्व वायूदलाच्या थ्री स्टार अधिकार्‍याकडे असेल.

२. हिंदी महासागरामध्ये वाढता धोका पहाता मेरिटाईम कमांडची स्थापना करण्यात येणार आहे. या कमांडकडे भारतीय सागरी क्षेत्राची सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्याचे दायित्व असणार आहे. सध्या तटरक्षकदल, नौदल आणि अन्य यंत्रणा सुरक्षा करत आहेत. या समवेतच आपल्याला मच्छीमारही साहाय्य करतात. या सर्वांचा समन्वय मेरिटाईम कमांड करील.

वेस्ट आणि नॉर्थ फ्रंट स्थापन करणार !

जनरल रावत यांनी सीमेवर ‘वेस्ट फ्रंट’ आणि ‘नॉर्थ फ्रंट’ स्थापन करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली.