मडुरा येथे रेशन दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप !

निकृष्ट धान्य न स्वीकारण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्राहकांना आवाहन

सावंतवाडी – तालुक्यातील मडुरा येथील एका ग्राहकाला रास्त दराच्या धान्य दुकानातून (रेशन दुकानातून) घेतलेल्या २५ किलो धान्यामध्ये दीड ते २ किलो वाळू आणि खडी मिळाल्याची तक्रार ग्राहकाने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली होती. धान्यामध्ये भेसळ असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा तालुका दक्षता समितीचे सदस्य पुंडलिक दळवी यांनी धान्य गोदामाला भेट देऊन पहाणी केली. या वेळी त्यांनी ‘रास्त दराच्या धान्य दुकानावर निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असेल, तर ग्राहकांनी ते स्वीकारू नये’, असे आवाहन केले. तसेच ‘या प्रकाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी’, अशी मागणीही त्यांनी केली.

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सावंतवाडी येथे गोदामाला भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली असता गोदामातील धान्य चांगल्या प्रतीचे असल्याचे आढळले. ३० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक दळवी यांनीही भेट देत पहाणी केली. तेव्हा त्यांनाही गोदामातील धान्य चांगल्या प्रतीचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शहरातील काही रेशन दुकानांना भेट देऊन धान्याची पहाणी केली. या वेळी त्यांनी ‘निकृष्ट धान्य गोदामात असेल, तर ते वितरीत करू नका’, अशी सूचना धान्य दुकानदारांना केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मडुरा रेशन दुकानावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित !

बांदा – मडुरा रेशन दुकानातून ५५५ ग्राहकांना धान्य पुरवठा करण्यात आला. त्यापैकी केवळ एकालाच निकृष्ट धान्य पुरवठा झाला आणि अन्य कोणत्याही ग्राहकाला निकृष्ट धान्य मिळाले नाही. त्यामुळे मडुरा रेशन दुकानातून निकृष्ट धान्य मिळाल्याचा करण्यात आलेला आरोप बिनबुडाचा आणि केवळ राजकीय आकसापोटी करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष संतोष परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.