संभाजीनगर येथे मद्यधुंदीत २ पोलिसांवर आक्रमण करणार्‍या ‘एन्.एस्.जी’च्या सैनिकाला अटक !

असे सैनिक संरक्षण दलाला कलंकच आहेत !

संभाजीनगर – येथील नगर नाक्यावर ३० जून या दिवशी ‘एन्.एस्.जी’चा (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) सैनिक गणेश भुमे (वय ३४ वर्षे, रा. फुलंब्री) मद्यधुंदीत विनामास्क चारचाकी वाहन चालवतांना पोलीस जमादार किशोर घोडेले यांनी त्यांना अडवले. विनामास्क असल्याविषयी पोलिसांनी दंड भरायला सांगितले असता भुमे याने ‘मी ‘एन्.एस्.जी’चा सैनिक आहे, मला का अडवले?’, असे म्हणत त्याने दंड भरायला नकार दिला. त्यानंतर त्याने घोडेले यांना मारहाण चालू केली. या वेळी मध्यस्थी करणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भागिले यांनाही भुमे याने मारहाण करून गंभीर घायाळ केले. या घटनेत भागिले आणि घोडेले दोघे घायाळ झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी भुमे याच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. (भुमे यांच्यासारख्या सैनिकाने मद्यधुंदीत पोलिसांशी असे वर्तन करणे लज्जास्पद आहे. अशा सैनिकांना तात्काळ बडतर्फ करायला हवे. – संपादक)

‘एन्.एस्.जी’मध्ये गणेश हवालदार असून ‘रेंजर टू’ म्हणून कार्यरत आहे. हरियाणातील मानेसर येथे त्यांचे मुख्यालय आहे. अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या ताफ्यात हा विभाग काम करतो. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर भुमे याने मी केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षारक्षक असल्याचा दावा करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांशी संपर्क केल्यानंतर तो हवालदार असल्याचे समजले.