बिहार-नेपाळ सीमेवर सापडले ८ चीननिर्मित ड्रोन !

तिघा तस्करांना अटक !

मोतिहारी (बिहार) – जम्मूमधील सैन्य आणि वायू दल यांच्या तळांच्या परिसरात जिहादी आतंकवाद्याकडून ड्रोनच्या माध्यमांतून आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असतांना आता बिहारमधील नेपाळ सीमेवरही ८ चीननिर्मित ड्रोन सापडले आहेत. पूर्व चंपारण जिल्ह्यातील सीमेवर सशस्त्र सीमा दलाच्या सैनिकांनी एका चारचाकी गाडीमधून ८ ड्रोन आणि ८ कॅमेरे जप्त केले आहेत. नाकाबंदीच्या वेळी हे ड्रोन सापडले. या गाडीमधील तिघांना अटक करण्यात आली आहे. विक्की कुमार, राहुल कुमार आणि कृष्णनंदन कुमार अशी या तिघांची नावे असून ते बिहारच्या सीतामढी अन् पूर्व चंपरण जिल्ह्यांत रहाणारे आहेत. त्यांच्यावर तस्करीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळ सीमेवरच अडीच कोटी रुपयांचे चरस जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी समीर शेख या तस्कराला अटक करण्यात आली होती. भारत-नेपाळ सीमा सर्वांसाठी उघडी असल्याने या सीमेवरून होणारी तस्करी रोखणे कठीण आहे, असे सुरक्षादलांचे म्हणणे आहे.