सातारा येथील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

असे शिक्षणाधिकारी शिक्षण खात्याला कलंकच आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. अशांवर कठोर कारवाई आणि समाजात छी थू झाली, तरच पुन्हा असे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

सातारा, ३० जून (वार्ता.) – एका शिक्षिकेच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करणारे गटशिक्षणाधिकारी संजय श्रीरंग धुमाळ यांच्यावर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

५ ऑक्टोबर २०१८ या दिवशी पीडित महिला शिक्षिकेला धुमाळ यांनी पंचायत समितीमध्ये स्वत:च्या दालनामध्ये बोलावून त्यांना बदलीसाठी विचारू लागले, तसेच वैयक्तिक माहिती विचारून घेतली. काही दिवसांनी शाळा व्यवस्थापन समितीला या महिला शिक्षिकेचे कामकाज चांगले नसल्याचा अर्ज (शेरा) पंचायत समितीकडे देण्यास भाग पाडले. यानिमित्ताने धुमाळ शिक्षिकेच्या शाळेला सतत भेटी देऊ लागले. यातूनच महिला शिक्षिकेशी जवळीक साधत धुमाळ यांनी शरीरसुखाची मागणी केली.