नगर येथील अनेक लाभधारकांची ७ कोटी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या रॅकेटमधील एका आरोपीस नाशिक येथून अटक

सोनई (नगर), २९ जून – सोनई आणि परिसरात ४ वेगवेगळ्या संस्थेचे नाव घेत एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमीष दाखवून अनेक लाभधारकांची ७ कोटी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या ६ जणांच्या रॅकेटमधील विष्णु भागवत या आरोपीस सोनई पोलिसांनी २२ जून या दिवशी नाशिक येथून अटक केली आहे. या परिसरातील अनेक तक्रारदारांच्या वतीने आण्णासाहेब दरंदले यांनी १२ जानेवारी २०२१ या दिवशी सोनई पोलिीस ठाण्यात तक्रार दिली होती.

संबंधितांनी वर्ष २०१७ ते वर्ष २०१९ या कालावधीत पैसे जमा करून नेले होते. विमान प्रवासाने सहल आणि भूमी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे आमीष असल्याने अनेकांनी यात पैसे गुंतवले होते. वर्ष उलटूनही रक्कम मिळाली नसल्याने, तसेच पैसे मिळायची शक्यता नसल्याने अखेर ७ मासांपूर्वी तक्रार दिली होती. या फसवणूक प्रकरणातील अन्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे साहाय्यक पोलिीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी सांगितले.