वराड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. परूळेकर महाराज यांचा देहत्याग !

प.पू. परूळेकर महाराज

मालवण, २८ जून (वार्ता.) – तालुक्यातील कुसरवेवाडी, वराड येथील थोर संत प.पू. परूळेकर महाराज (वय ८४ वर्षे) यांनी येथील ‘श्रीरामनगरी’ आश्रमात २८ जून २०२१ या दिवशी सकाळी ९ वाजता देहत्याग केला. प.पू. परूळेकर महाराज गेले काही मास आजारी होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला दुपारी २.१५ वाजता ‘श्रीरामनगरी’ आश्रमातील श्रीराम मंदिर आणि श्री दत्त मंदिर या मंदिरांच्या मधल्या परिसरात समाधीस्त करण्यात आले. प.पू. परूळेकर महाराज यांचे कनिष्ठ बंधू श्री. केशव महादेव परूळेकर यांनी समाधीचे सर्व विधी केले, तर पौरोहित्य श्री. विनोद गगनग्रास यांनी केले.

प.पू. परूळेकर महाराज यांच्या पश्चात ३ भाऊ, ३ बहिणी, भावजया, पुतणे, सुना, भाचे जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या कट्टा येथील अधिवक्ता रूपेश परूळेकर यांचे ते काका होते. अधिवक्ता परूळेकर यांनी प.पू. परूळेकर महाराज यांच्या आजारपणात त्यांची अतिशय भावपूर्ण सेवा केली. सनातन परिवार परूळेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

प.पू. परूळेकर महाराज यांचा परिचय

लहानपणीच दिव्य दृष्टी आणि वाचासिद्धी यांची प्राप्ती !

‘लहानपणीच प.पू. महाराजांची दृष्टी गेली, तरीही त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. बालपणीच त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडत असे. या सिद्धीमुळे अनेकांना ते भविष्यातील कित्येक गोष्टी सांगत.

मंदिरे बांधण्याची आवड आणि श्री दत्तगुरूंचा साक्षात्कार !

प.पू. महाराजांना लहानपणापासूनच मंदिरे बांधण्याची आवड होती. लहानपणीच त्यांनी मंदिरे बांधण्याच्या उद्देशाने दगड जमवण्यास आरंभ केला होता. लहानपणी प.पू. महाराजांना श्री दत्तगुरूंनी दृष्टांत दिला.

श्री दत्तगुरूंनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी प.पू. महाराजांनी औदुंबराचे रोपटे लावले होते. पूर्वी तेथे थोडीशी झाडी होती. त्यानंतर प.पू. महाराजांनी तेथे श्री दत्ताचे मंदिर बांधण्याचे ठरवले. पुढे शेजारीच त्यांनी श्रीरामाचेही मंदिर बांधले. या भागाला आता ‘श्रीरामनगरी’ असे संबोधले जाते. मंदिरांतील मूर्ती प.पू. महाराजांच्या भक्तांनीच त्यांना दिल्या आहेत. या मंदिरांत भजन, आरती आदी कार्यक्रम होतात. स्थानिक, तसेच महाराष्ट्र अन् गोवा येथील प.पू. महाराजांचे भक्त त्यांच्याकडे नियमितपणे येत असत. विविध भागांतील संतांनीही या मंदिरांत प.पू. महाराजांची भेट घेतली आहे.

प.पू. परूळेकर महाराज आणि सनातन

सनातनचे साधक त्यांच्याकडे गेल्यानंतर प.पू. महाराज त्यांची आवर्जून विचारपूस करत. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ते रामाच्या रूपात पहात. प.पू. महाराजांनी सनातनच्या गुरुपौर्णिमेसह प्रबोधनपर सर्व उपक्रमांना शुभाशीर्वाद दिले होते. २८ एप्रिल २००२ या दिवशी सावंतवाडी येथील सर्वसंप्रदाय सत्संगाला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हिंदु धर्मजागृती सभांमध्ये ते आवर्जून उपस्थित रहात आणि धर्मजागृतीचे कार्य यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देत. सनातनवरील निरपेक्ष प्रीतीमुळेच ते आजपर्यंत सनातनसाठी अविश्रांतपणे झटत होते. यामुळे त्यांना बर्‍याचदा आध्यात्मिक त्रासही सहन करावा लागला होता. त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबळी, करणी तोडणे आदींसारखे विधी करून त्यांनी साधकांचे आध्यात्मिक त्रासही न्यून केले आहेत. सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सलग १२-१२ घंटे न थांबता प.पू. महाराजांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले होते. प.पू. महाराजांनी दिलेल्या विभूतीच्या माध्यमातूनही कित्येकांचे अनिष्ट शक्तींच्या संदर्भातील त्रास न्यून झाले होते.

मला आयुरारोग्य लाभण्यासाठी आणि सनातनच्या साधकांचे अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी अविश्रांत झटणारे प.पू. परूळेकर महाराज यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे प.पू. परुळेकर महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीचा क्षण ! (वर्ष २०१५)

‘सनातन संस्थेने जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्य चालू केले, तेव्हा ज्या काही संतांनी या कार्यासाठी साहाय्य केले, त्यातले एक प्रमुख संत म्हणजे प.पू. परूळेकर महाराज होते. मला आयुरारोग्य लाभण्यासाठी आणि सनातनवर येणारी अरिष्टे दूर होण्यासाठी प.पू. परूळेकर महाराज हे वर्ष २००० पासून आतापर्यंत प्रतिदिन रात्री २ ते सकाळी ६ या कालावधीत नामजप करत होते. माझा महामृत्यूयोग टळण्यासाठी प.पू. महाराज आणि काही इतर संत यांनी केलेल्या अनुष्ठानांमुळे मी जिवंत आहे अन् सनातनचे कार्य वेगाने वाढत आहे. वर्ष २०१२ मध्ये झालेल्या भेटीत प.पू. महाराजांनी मला सांगितले होते, ‘‘माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी अनुष्ठान करणार आहे.’’ त्यांनी आपले हे शब्द खरे ठरवले. यातूनच त्यांच्यातील दिव्यत्वाची प्रचीती येते. ते लहानपणापासूनच सिद्ध पुरुष होते. त्यांना दृष्टी नसली, तरी त्यांना ईश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. ते काळाच्या पलीकडचे पाहू शकत होते. प.पू. महाराजांनी सनातनच्या साधकांवर निरपेक्ष प्रेम केले. त्यांच्यासारखे संतच असे निरपेक्ष प्रेम करू शकतात.

आज ते जरी स्थूलदेहाने आपल्यात नसले, तरी सूक्ष्मातून त्यांचे कार्य अविरत चालूच रहाणार आहे. प.पू. महाराजांनी जशी ईश्वरावर श्रद्धा ठेवून अविरत साधना केली, तशी साधना त्यांच्या भक्तांनी आणि सनातनच्या साधकांनी तळमळीने करत रहाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. माझा मृत्यूयोग टळण्यासाठी आणि सनातनच्या साधकांचे अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत नामजपादी उपायांच्या माध्यमातून अविश्रांत झटणारे प.पू. परूळेकर महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक