ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान’ पुरस्कार प्रदान !

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कारचे वितरण

१. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ३. पुरस्कार स्वीकारतांना भाऊ तोरसेकर

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर यांना २३ जून या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलीदानदिनाच्या निमित्ताने राजभवन येथे ‘दीपकमल फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, ‘दीपकमल फाऊंडेशन’चे अध्यक्ष अमरजित मिश्र आदी व्यासपिठावर उपस्थित होते. कोरोनाच्या निर्बंधांमुळे ठराविक निमंत्रितच कार्यक्रमाला उपस्थित होते.

श्री. भाऊ तोरसेकर यांना दैनिक ‘सामना’ मध्ये पत्रकारिता करतांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले होतेे. सध्या ते स्वतःच्या ‘प्रतिपक्ष’ नावाच्या ‘यु ट्यूब चॅनेल’वरून राजकीय घटनांचे विश्‍लेषण करतात. त्यांचे राजकीय विश्‍लेषण नियमित पहाणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संकल्पनेतील स्वर्णिम भारत साकारणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणांचे बलीदान दिले. स्वत:च्या सिद्धांतांसाठी त्यांनी केंद्रीय मंत्रीपद सोडले. मुखर्जी यांचे स्वप्न साकार झाले असले, तरीही आज देश लडाख, अरुणाचल प्रदेश अशा अनेक आघाड्यांवर संकटांना तोंड देत आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एक होऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संकल्पनेतील ‘स्वर्णिम भारत साकारणे’, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकार आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

महाराष्ट्र आणि देश यांच्या राजकारणाचे अचूक विश्‍लेषण करणारी कुणी व्यक्ती या देशात असेल, तर त्या व्यक्तीचे नाव भाऊ तोरसेकर आहे. एखाद्या घटनेवर अनेक माध्यमे पतंगबाजी करतात; मात्र भाऊ तोरसेकर त्याचे योग्य विश्‍लेषण करतात. आम्ही कोणती कृती केली, तर ती का केली ?, हे आम्हाला ठाऊक असते; मात्र आमच्याशी न बोलताही मनातील ओळखल्याप्रमाणे भाऊ त्या घटनेचे अचूक विश्‍लेषण करतात. आणीबाणीच्या काळात या देशातील माध्यमे सत्तेच्या विरोधात लढली. अशा माध्यमांची परंपरा या देशाला आहे; पण दुर्दैवाने महाराष्ट्रात ही परंपरा पहायला मिळत नाही. अनेक महत्त्वपूर्ण प्रश्‍न आणि घटना यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पहायला मिळते. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकार आवश्यक आहेत. सत्तेविरुद्ध संघर्ष हा त्यांचा स्थायी भाव आहे.