सर्वोत्तम शिक्षण कोणते ?

कलियुगातील पहिले वेदऋषी पू. डॉ. शिवकुमार ओझा !

‘मी डॉक्टर म्हणजे विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. त्यामुळे मला कधी संस्कृत, राष्ट्रभाषा हिंदी किंवा माझी मातृभाषा मराठी यांच्या अभ्यासाची ओढ वाटली नाही. याउलट डॉ. शिवकुमार ओझा विज्ञानातले प्रसिद्ध संशोधक असूनही त्यांनी संस्कृत, हिंदी, अध्यात्मशास्त्र, भारतीय संस्कृती या विषयांवर अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांच्या ग्रंथातील प्रत्येक ओळ अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे ‘ते कलियुगातील पहिले वेदऋषी आहेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. डॉ. शिवकुमार ओझा

१. विषय प्रवेश

१ अ. ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे : ‘भारतीय संस्कृती’ या शब्दाचा अर्थ येथे ‘वैदिक संस्कृती, हिंदु धर्म किंवा सनातन धर्म’, असा आहे. हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार आहे. त्याचा आधार घेऊन प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाचे क्षेत्र अत्यंत विस्तृत आणि उपयोगी आहे. सृष्टीच्या तीन भागांत, म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक या प्रकारांत शिक्षणाचा विस्तार आहे. शिक्षणाचे आदान-प्रदान मनुष्याच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने आजीवन चाललेले असते. प्राचीन भारतात शिक्षण देण्याची प्रक्रिया बाळ आईच्या पोटात असल्यापासून आरंभ होत असे.

१ आ. शिक्षण ग्रहण अन् प्रदान करण्याची क्षमता प्रत्येक मनुष्यात निराळी असणे आणि ‘ज्ञानाची वृद्धी करणे’ हे शिक्षणाचे अभिन्न अंग असणे : ‘शिक्षण ग्रहण करणे किंवा शिक्षण देणे’, ही एक प्रक्रिया आहे. कोणतीही क्रिया करण्यासाठी मनुष्याजवळ मन, वाणी आणि शरीर ही तीन साधने असतात. भारतात अत्यंत प्राचीन काळापासून या तिन्ही साधनांचा उपयोग शिक्षणासाठी मोठ्या कुशलतेने करण्यात आला आहे. शिक्षणामध्ये मानवाच्या जीवनात परिवर्तन करण्याची प्रचंड शक्ती आहे. एका प्रकारच्या शिक्षणाद्वारे मनुष्य सदाचारी आणि महात्मा बनतो, तर दुसर्‍या प्रकारच्या शिक्षणामुळे मनुष्य दुराचारी आणि आतंकवादी बनतो. शिक्षण ग्रहण करण्याची, तसेच शिक्षण प्रदान करण्याची क्षमता आणि कौशल्य प्रत्येक मनुष्यात निरनिराळे असते. ‘ज्ञानाची वृद्धी करणे’, हे शिक्षणाचे एक अभिन्न अंग आहे. जीवनाप्रती आपला दृष्टीकोन आणि उद्देश निर्धारित करतो की, ज्ञानवर्धन कुठपर्यंत केले जावे आणि ज्ञानवर्धनासाठी शिक्षणाचे कोणते रूप किंवा कोणता प्रकार असायला पाहिजे ?

१ इ. आधुनिक प्रचलित शिक्षणपद्धतीतील दोषांचे निराकरण करण्याची आवश्यकता असणे : वर्तमानकाळात मनुष्यामध्ये असलेले बेशिस्तपणा, उदंडता, अनैतिकता, चारित्र्याचे अधःपतन, आई-वडील आणि गुरु यांच्याप्रती श्रद्धेचा अभाव, राष्ट्रीय भावनेचा अभाव, स्वार्थांधता इत्यादी दोष ही गोष्ट सूचित करतात की, आधुनिक काळातील प्रचलित शिक्षणात नक्कीच दोष आहेत आणि त्यांचे निराकरण करण्याची चिंता प्रत्येक राष्ट्राला असायला पाहिजे.

१ ई. आधुनिक विद्या आधिभौतिक असून त्या अत्यंत सीमित आणि संकुचित दृष्टीकोनांवर आधारित असणे : शिक्षण निश्चित करणे आणि त्यातील गुण-दोष हे ‘आपला मानवी जीवनाप्रती असलेला दृष्टीकोन संकुचित आहे कि व्यापक आहे ?’, यावर अवलंबून असतात. संकुचित आणि सीमित दृष्टीकोन असल्यामुळे शिक्षणसुद्धा संकुचित अन् सीमित होऊन जाते. आधुनिक समाजाच्या जीवनाप्रती असलेल्या मान्यता किंवा दृष्टीकोन यांनी आधुनिक भौतिक विद्यांना प्रतिष्ठित केले आहे आणि भौतिक स्तरांवर त्यांचे संवर्धन केले आहे. साधारणतः आधुनिक प्रचलित शिक्षणाचा संबंध विद्यार्थी दशेपर्यंतच सीमित असतो. त्यानंतर विविध उद्योगांमध्ये कधी कधी त्यांना अनुकूल असलेले विशेष अभ्यासक्रम (ट्रेनिंग) आपल्या कर्मचार्‍यांना देण्याची सोय असते. या सर्व विद्या भौतिक आहेत, आधिभौतिक आहेत, म्हणजेच भौतिक पदार्थांशी संबंध असणार्‍या आहेत. आधुनिक युगातील मानवी समाजाला या भौतिक विद्यांच्या शिक्षणाकडे अधिक आकर्षित आणि आसक्त केले आहे. सर्वांना ठाऊक आहे की, भौतिक विद्यांच्या शिक्षणामध्ये दोष आहेत आणि जर अधिक विचार केला, तर त्यामध्ये गंभीर दोषसुद्धा आहेत; परंतु ‘या दोषांवर कशी मात करायला पाहिजे ?’, यावर योग्य उपाय शोधण्यात आधुनिक समाज असमर्थ ठरला आहे. याचे कारण हे आहे की, आधुनिक विद्या या अत्यंत सीमित आणि संकुचित दृष्टीकोनांवर आधारित आहेत.

१ उ. भौतिक विद्यांमुळे भोगवादी मनुष्याच्या सांसारिक इच्छांची पूर्ती होत असल्याने त्याला उच्च स्तराचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा न उरणे आणि उच्च स्तराचे ज्ञान समजून घेण्यासही कठीण असणे : भोगवादी मनुष्य भौतिक विद्यांपुरता मर्यादित राहिला असून त्यांत आसक्त झाला आहे. त्यामुळे अन्य व्यापक दृष्टीकोन समजून घेण्यात त्याला रुची नसते आणि व्यापक दृष्टीकोनांवर आधारित विद्या समजून घेणेसुद्धा कठीण झाले आहे. एखाद्या व्यक्तीला कनिष्ठ श्रेणीचे (किंवा इयत्तेचे) थोडेसे ज्ञान मिळाल्यावर त्याला धनसंपत्ती प्राप्त करण्यात जर कसलीही अडचण येत नसेल आणि त्याच्या सर्व सांसारिक इच्छांची पूर्ती होत असेल, तर त्याला उच्च स्तराचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छाच उरत नाही आणि उच्च स्तराचे ज्ञान समजून घेण्यासही कठीण आहे; परंतु उच्च स्तराच्या विद्यांमध्ये कनिष्ठ स्तराच्या विद्यांमुळे प्राप्त न होणारे, तसेच अनेक अनुत्तरित प्रश्न किंवा शंका यांचे समाधान करण्याचे सामर्थ्य असते.

१ ऊ. आधुनिक भौतिक विद्यांचे सृजन मानवाच्या प्राथमिक आवश्यकतांच्या पूर्तीसाठी असणे : मनुष्याचे नैसर्गिक अनुभव हे आधुनिक भौतिक शिक्षणाचा आधार आहेत. भौतिक संस्कृती समजते, ‘अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या अनिवार्यता आहेत. ‘मनुष्याच्या आहाराची पूर्ती, निद्रा (विश्रांती), भयापासून रक्षण मिळणे आणि कामवासनेची पूर्ती करणे’, या मनुष्याच्या आवश्यकता आहेत.’ याच आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना भव्य बनवण्यासाठी आधुनिक भौतिक विद्यांचे सृजन झाले आहे. त्याच दिशेने शोधकार्याचे प्रयत्न झाले आहेत आणि त्यानुसार अनुकूल शिक्षणाचा प्रसार झाला आहे.

१ ए. भारतीय संस्कृती मनुष्याच्या जीवनाच्या वास्तवावर प्रकाश टाकत असणे : भारतीय संस्कृती या भौतिक जीवनावर प्रश्नचिन्ह उभे करते. भारतीय संस्कृती विचारणा करते, ‘जीवनाचे वास्तव आणि पूर्णता ही केवळ मनुष्याच्या नैसर्गिक आवश्यकतांची पूर्तता करण्यामध्येच, तसेच भौतिक सुखसुविधांच्या भोगातच आहे का ? मग हे भौतिक जीवन पाशवी का होत चालले आहे ? या भौतिक जीवनासाठी संघर्षसुद्धा पुष्कळ आहे आणि तरीही मनुष्याला समाधान का लाभत नाही ? आमची भोगवादी वृत्ती आणि इच्छा संपत का नाहीत ? जीवनात सुख-दुःख वारंवार का येत रहातात ? आमच्या दुःखाचा अंत का होत नाही ? मनुष्य आसुरी वृत्तींनी (लोभ, मोह, क्रोध, ईर्ष्या, द्वेष इत्यादींनी) ग्रस्त आहे. त्याची बुद्धी दोषयुक्त आणि मर्यादित झाली आहे.

१ ऐ. अर्धवट शिक्षणाने मानवी समस्या निर्माण होणे : ‘मी कोण आहे ? मी या जगात का आलो आहे ? कोणत्या सूक्ष्म प्रक्रियांद्वारे आलो आहे ? किती काळ रहाणार आहे ?’, इत्यादी गोष्टी मनुष्य स्वतःच जाणत नाही. त्यामुळे भारतीय संस्कृती प्रश्न विचारते, ‘अशा बुद्धीच्या आधारावर राहून ‘जीवनाची ध्येयनिश्चिती, कर्तव्यकर्मांची निश्चिती, समाजाचे कायदे बनवणे’ इत्यादी योग्य प्रकारे निश्चित केले जाऊ शकतात का ?’ याचे उत्तर जर ‘हो’ असेल, तर या अमूल्य मानवी जीवनाशी खेळ खेळल्यासारखे होणार नाही का ? शिक्षणाची पूर्णता प्राप्त करण्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवणे आवश्यक आहे. अर्धवट शिक्षण जर मानवी समस्या निर्माण करून त्यांचा विस्तार करत असेल, तर त्यात कोणतेच आश्चर्य नाही.’

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक, ठाणे

(साभार : ‘सर्वोत्तम शिक्षा क्या है ?’)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490341.html