सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यातील ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’ या ग्रंथातील लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत. २० जून २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, भारतीय संस्कृती मनुष्याच्या जीवनाच्या वास्तवावर प्रकाश टाकत असणे आणि अर्धवट शिक्षणाने मानवी समस्या निर्माण होणे याविषयीची माहिती वाचली.

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/488506.html
पू. डॉ. शिवकुमार ओझा

१. विषय प्रवेश

१ ओ. मनुष्याने निश्चित केलेले ध्येय प्राप्त करून देणारे शिक्षणच सर्वाेत्कृष्ट असणे : ‘जे शिक्षण मनुष्याला त्याने निश्चित केलेले ध्येय कौशल्याने प्राप्त करून देण्याचे साधन ठरेल, त्या शिक्षणालाच संपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट म्हणता येईल. ‘मनुष्य स्वतः कोण आहे ? तो कशासाठी आहे ? ज्या जगात तो रहात आहे, ते काय आहे आणि ते कशासाठी बनले आहे ?’, हे जोपर्यंत मनुष्य जाणत नाही, तोपर्यंत मनुष्याला योग्य ध्येय निर्धारित करणे शक्य नाही अन् या ध्येयांना प्राप्त करवून देणारे शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे तर आणखी कठीण आहे, उदा. कोणत्याही औषधाची (‘मेडिसिन’ची) निर्मिती जेव्हा उपचारासाठी केली जाते, तेव्हा त्या औषधाचे स्वरूप आणि गुण जाणून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हेसुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे की, जेथे हे औषध असेल (मनुष्याच्या शरिरात किंवा अन्यत्र), तेथील वातावरणाचा परस्पर (म्हणजेच औषध आणि वातावरण यांच्यातील) प्रभाव काय होईल ? या दोन्ही प्रकारच्या वास्तविकतेचे योग्य ज्ञान होणे आवश्यक आहे; कारण त्यापासून अनभिज्ञ राहून औषधाचा उपयोग करणे हानीकारकसुद्धा होऊ शकते.

१ औ. मनुष्यरूपी उत्पादनाचा योग्य उपयोग होण्याची आवश्यकता असणे : जगातील कोणतीही लौकिक उत्पादने (प्रॉडक्टस), उदा. ‘औषधे, उपकरणे, मशीन (यंत्र) इत्यादींचा उपयोग कसा करावा ?’, याविषयी उत्पादक डब्यावर, कागदावर किंवा पुस्तिकेत सूचना लिहून देतात, जेणेकरून मनुष्य त्या उत्पादनाचा पूर्ण लाभ घेऊ शकेल. त्याचप्रमाणे मनुष्यसुद्धा या जगातील एक उत्पादनच (प्रॉडक्ट) आहे. त्यामुळे मनुष्याने हा विचार करायला हवा की, मनुष्यरूपी उत्पादनाचा योग्य उपयोग होण्याची कृती कुठे दिलेली आहे ? मनुष्य स्वतः या विषयात योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे का ?

१ अं. ‘अनेक अव्यक्त घटकांच्या मिश्रणापासून बनलेल्या वस्तूतील सर्वांत महत्त्वाचा घटक कोणता ?’, हे ओळखणे कठीण असणे आणि त्याप्रमाणे ‘मनुष्याच्या शरिरात सर्वांत अधिक प्रमुख घटक कोणता आहे ?’, हे सांगणे कठीण असणे : ‘मनुष्य काय आहे ?’, या गंभीर प्रश्नाच्या उत्तरात शिक्षणाशी घनिष्ठ आणि प्रत्यक्ष संबंध असलेल्या गोष्टी समाविष्ट आहेत. शास्त्रामध्येही हा प्रश्न बर्‍याच वेळा विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे तात्पर्य आणि उत्तर समजून घेण्याचा येथे प्रयत्न करूया.

जेव्हा कोणतीही वस्तू अनेक पदार्थांच्या मिश्रणाने सिद्ध झालेली असते, तर हे जाणून घ्यायला कठीण होते की, या मिश्रणातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता आहे ? जेव्हा त्या घटकामध्ये काही अव्यक्त घटकही अंतर्भूत असतात, तेव्हा तर ही अडचण पुढे अधिकच वाढत जाते, उदा. एखाद्या ठिकाणी अग्नी पेटवण्यासाठी स्थान, लाकूड, तूप किंवा तेल, काडेपेटी किंवा अग्नीची ठिणगी, हवा किंवा इतर अव्यक्त पदार्थ यांची आवश्यकता असते. ‘या सर्व पदार्थांमध्ये सर्वांत मुख्य पदार्थ कोणता आहे ?’, असे जर वेगवेगळ्या व्यक्तींना विचारले, तर त्याचे उत्तर वेगवेगळे मिळेल, यात आश्चर्य नाही. त्याच प्रकारे ‘अस्थी, मांस, रक्त, नसा, मन, बुद्धी, इंद्रिये किंवा अन्य अव्यक्त घटक इत्यादींच्या मिश्रणाने तयार झालेल्या मनुष्याच्या शरिरात सर्वांत अधिक प्रमुख घटक कोणता आहे ?’, हे सांगणे अत्यंत कठीण आहे, म्हणजेच ज्या पदार्थाला मनुष्य ‘मी’ असे संबोधित करतो, तो त्याला ठाऊक नाही.

१ क. ‘आत्मा’ मनुष्याच्या शरिरात अव्यक्त आणि इंद्रियातीत रूपाने विद्यमान असल्याचे ज्ञान वेदांतून प्राप्त होणे : या तत्त्वाचे सर्वप्रथम ज्ञान आणि सर्वसाधारण प्रमाण मनुष्याला वेदांतून प्राप्त झाले आहे. हे तत्त्व आत्मतत्त्व (आत्मा) आहे. हा ‘आत्मा’ मनुष्याच्या शरिरात अव्यक्त आणि इंद्रियातीत रूपाने विद्यमान आहे. हा आत्मा सर्वत्र, म्हणजे विश्व किंवा ब्रह्मांड यांतील कणाकणांत (म्हणजे सर्व ठिकाणी चराचरांत) परमात्मा रूपाने आहे. ज्याप्रमाणे घागरीत भरलेले समुद्राचे पाणी आणि सागरात असलेले समुद्राचे पाणी यांमध्ये कोणतेच अंतर नसते, त्याप्रमाणे आत्मा अन् परमात्मा यांमध्ये कोणतेच अंतर नाही.

१ ख. आत्म्याच्या अधिष्ठानामुळे समस्त ज्ञान-विज्ञान प्राप्त होत असल्यामुळे मनुष्याने ते अधिष्ठान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असणे : एखाद्याला अशी शंका येऊ शकते की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आत्म्याशी काय देणे-घेणे आहे ? दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत; परंतु असे नसून शिक्षणाचा आत्म्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे; कारण ज्याचे शिक्षण दिले जाते, ते समस्त ज्ञान-विज्ञान त्याच आत्मारूपी स्रोतातून निघते आणि प्रवाहित होते. ज्याच्या अधिष्ठानामुळे समस्त ज्ञान-विज्ञान प्राप्त होते, तेच अधिष्ठान प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यातच मनुष्याची बुद्धीमत्ता आहे.

१ ग. भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेने भौतिक विद्यांच्या समवेत आध्यात्मिक विद्यांचे शिक्षण अत्यावश्यक स्वरूपात प्रदान करण्याचा परिपाठ असणे : आत्मा ही चेतनाशक्ती आहे आणि अन्य अनंत शक्तींचे भांडार आहे. त्यामुळे ‘भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाचे सर्वाेच्च ध्येय मनुष्याला त्याच आत्मतत्त्वाशी (आत्मा, चेतनाशक्ती यांच्याशी) जोडणे (योग करणे)’, हे आहे. याचा लाभ असा आहे की, मनुष्यात अमर्यादित बौद्धिक आणि अन्य शक्तींचा संचार होतो. ज्या विद्येच्या अंतर्गत हे येते, त्याला ‘अध्यात्म विद्या’ म्हटले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेने भौतिक विद्यांच्या समवेत आध्यात्मिक विद्यांचे शिक्षण अत्यावश्यक स्वरूपात प्रदान करण्याचा परिपाठ आहे. आध्यात्मिक विद्यांच्या सर्वसाधारण शिक्षणामुळेच मनुष्यामध्ये सद्गुणांचा विकास होतो आणि सदाचाराचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढते. त्यासाठी प्रयत्न केला जातो.’

(क्रमशः पुढील रविवारी)

– (पू.) डॉ. शिवकुमार ओझा, ज्येष्ठ संशोधक आणि भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक

(साभार : ‘सर्वाेत्तम शिक्षा क्या है ?’)