‘प्रोग्रामिंग’चे जनक : महर्षि पाणिनी !

महर्षि पाणिनी हे संगणक ‘प्रोग्रामिंग’चे जनक आहेत. महर्षि पाणिनी यांनी गणनाशास्त्रावर आधारित ‘अष्टाध्यायी’ नावाचा ग्रंथ लिहिला, जो आजच्या संगणक ‘प्रोग्रामिंग’साठी आदर्श आहे. पाणिनी हे संस्कृत व्याकरणाचे महान तज्ञ होते. ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात ८ अध्याय आणि अनुमाने ४ सहस्र सूत्रे आहेत, ज्यांत भाषा-विज्ञान अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेले आहे. पाश्चात्त्य संशोधकांनी पाणिनींच्या ग्रंथाचे मूल्यमापन केले. प्राचीन भारतात ऋषिमुनींनी लावलेले शोध हे विदेशी लोकांनी स्वतःच्या नावे करून खोटे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकात भारताचा खरा इतिहास, म्हणजे ऋषिमुनींचा शिकवणे आवश्यक आहे. जर्मन भाषावैज्ञानिक फ्रेडरिक फ्रेज यांनी पाणिनींच्या सूत्रांच्या आधारे आधुनिक तर्कशास्त्राचा पाया रचला. ‘नासा’चे वैज्ञानिक रिक ब्रिग्स यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टीफिशल इंटेलिजन्स) आणि पाणिनी व्याकरणातील साम्य शोधले. त्यानंतर अनेक देशांनी या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी कोट्यवधी डॉलर व्यय केले.

‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ने महर्षि पाणिनी यांच्या योगदानाने प्रेरित होऊन ‘पाणिनी प्रोग्रामिंग लँग्वेज’ ही संगणकीय प्रणालीची भाषा विकसित केली आहे. ‘एम्.एल्.बी.डी.’ वृत्तपत्रिकाने (‘भारतीय विद्याविषयक ग्रंथसंपदे’संबंधी मासिक) एप्रिल १९९३ मध्ये महर्षि पाणिनी यांना ‘फर्स्ट सॉफ्टवेअर मॅन विदाआऊट हार्डवेअर’ घोषित केले होते. पाणिनींच्या व्याकरणीय प्रणालीत वापरलेले तर्कशास्त्र आणि नियमबद्धता संगणक विज्ञानात, विशेषतः प्रोग्रामिंग भाषांच्या डिझाईनमध्ये प्रेरणादायक ठरले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आकाशयान (विमान), शरिरावरील शस्त्रक्रिया आदींचे शोध पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या पूर्वी शेकडो वर्षे ऋषिमुनींनी लावले आहेत. ऋभूऋषींनी दूध देणारी गाय उत्पन्न केली. हा ‘जेनेटिक इंजिनियरिंग’चा पहिला प्रयोग असावा. आधुनिक विज्ञानाने छायाचित्रित केलेल्या तेजोमेघांचे वर्णन सहस्रो वर्षांपूर्वींच्या ऋग्वेदात आहे. सहस्रो वर्षांपूर्वीच्या महाभारतात पर्जन्यास्त्र, आग्नेयास्त्र यांचा उल्लेख आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर काळाचा वेग मंदावतो, हे प्राचीन ऋषिमुनींना ठाऊक होते. विज्ञानाला ते आता समजले. न्यूटनच्या आधी १ सहस्र वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणाची संकल्पना महर्षि पतंजली, ब्रह्मगुप्त २ यांनी मांडलेली आहे. हिंदूंना ‘मागास’ आणि ‘अवैज्ञानिक’ म्हणून हिणवणार्‍या देशी अन् विदेशी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ही चपराक आहे.

भारतियांनो, प्राचीन वैज्ञानिक आणि ऋषिमुनी यांनी विविध शास्त्रांद्वारे घडवलेला गौरवशाली इतिहास जाणा अन् पाश्चात्त्यांच्या मागे न धावता वैभवशाली प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगा !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे