नागपूर येथील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करा ! – भाजप शिक्षक आघाडीची मागणी

नागपूर – ‘शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा रहित केली; मात्र दहावीच्या अंदाजे १६ लाख आणि बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांनी १४० कोटी रुपयांच्या घरात परीक्षा शुल्क शिक्षण विभागाकडे जमा केले होते. आता परीक्षाच झाली नसल्याने त्यावर होणारा व्ययही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जमा केलेली शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करावी’, अशा मागणीचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीच्या राज्य संयोजिका डॉ. कल्पना पांडे आणि पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांनी मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्री यांना पाठवले आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे सर्वांवरच आर्थिक संकट असल्याने परीक्षेचे पैसे विद्यार्थ्यांना परत केल्यास त्यांना आधार मिळणार आहे. दोन्ही इयत्तांच्या परीक्षा रहित झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा उत्तरपत्रिका अन् प्रश्‍नपत्रिका यांचा व्यय, परीक्षा पर्यवेक्षकांचा व्यय, तसेच मूल्यांकन आणि नियमकाचा व्ययही वाचला आहे. परीक्षेवर होणारे इतर व्ययही थांबले आहेत. शिक्षण मंडळाला केवळ गुणपत्रिकांचा व्यय येणार आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाकडे परीक्षेसाठी जमा करण्यात आलेली मोठी रक्कम शिल्लक रहाणार आहे.