नगरमध्ये मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी कसायांच्या कह्यातून केली १४ गायींची सुटका !

कसायांकडून स्वामी यांच्या गाडीवर आक्रमण आणि त्यांना ठार मारण्याची धमकी

  • मानद पशूकल्याण अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर पोलीस समवेत असतांना आक्रमण होणे चिंताजनक ! यावरून धर्मांध कसायांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच अशा घटनांमधून वारंवार दिसून येते.
  • उद्दामपणे वागणार्‍या कसायांवर कारवाई करून सर्वांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करणारे टेम्पो

नगर – मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, त्यांचे सहकारी सनी येलवंडे, अक्षय जाधव आणि सचिन शिंदे हे पुण्याच्या दिशेने येथून ९ जून या दिवशी येत होते. त्या वेळी त्यांना चासगावाजवळ २ पिकअप टेम्पो गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांना या गाड्यांना थांबवले. गाड्यांची पहाणी केली असता त्यामध्ये एकूण १४ गायी आणि वासरे दाटीवाटीने कोंबून त्यांचे चारही पाय बांधलेल्या स्थितीत आढळून आले. (महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अवैधपणे गोवंशियांची वाहतूक होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! यावरून गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही किती प्रभावीपणे आवश्यक आहे, हेच लक्षात येते. – संपादक) स्वामींनी तात्काळ पोलिसांचे साहाय्य घेऊन गोवंशियांची सुटका केली. या वेळी कसायांनी शिवशंकर स्वामी यांना ठार मारण्याची धमकी दिली.

मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी

१. या वेळी पोलिसांच्या साहाय्याने दोन्ही वाहने आणि चालक यांना घेऊन पोलीस ठाण्याला जात असतांना काही दुचाकींवर आलेले १० ते १२ कसायी शिवशंकर स्वामी यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न करत होते.

२. यापुढे काही कसायांनी येथील चांदणी चौकात स्वामी यांची गाडी अडवली आणि तिच्यावर कोयते मारण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.

३. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करून गाडीमधील सर्व गोवंश नगरमधील ‘निसर्गसृष्टी गोपालन संस्थे’मध्ये सुखरूप पोच केले.