सोलापूर – उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने धरणाच्या पाणी पातळीत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू पावसाळी हंगामाच्या आरंभीच्या ७ दिवसांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळी क्षेत्रात १ सहस्र ३४८ मिलीमीटर, तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीची टक्केवारी तब्बल उणे २२ पर्यंत गेली होती. पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती आता उणे १९ टक्क्यांवर आली आहे.
पुढील काळात पूरस्थिती ओढावण्याची शक्यता !
पावसामुळे हवेतील उष्णता न्यून होऊन आर्द्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण ७.५० मिलीमीटर वरून ०.८१ मिलीमीटरपर्यंत आले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा प्रारंभ झाला असून उजनी धरणाच्या वरील बाजूस असणार्या १८ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही थोडीफार वाढ झाली आहे. उजनीच्या वरील बाजूस असणार्या धरणांपैकी जवळपास ५ धरणांची पाणीपातळी अधिक ५० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे पाऊस पडण्याविषयी वर्तवलेला अंदाज आणि या धरणाची स्थिती यांचा विचार केला असता यापुढील काळात पूरस्थिती ओढावण्याची शक्यता आहे. गेल्या ३ दिवसांत उजनी धरणात ८.४४ दशलक्ष घनमीटर पाणी वाढले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.