कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या अधिकृत संख्येपेक्षा अधिक असण्याची शक्यता ! – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो

पणजी, १० जून (वार्ता.)-  गोवा राज्यात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या शासनाकडून अधिकृतरित्या घोषित केलेल्या संख्येपेक्षा अधिक असू शकते, असे प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनी केले आहे. मंत्री लोबो यासंदर्भात पुढे म्हणाले,

१. ‘‘कित्येक मृत्यूंची नोंदणी कोरोनांतर्गत झालेली नाही. एखादा रुग्ण हृदयविकारामुळे मृत्यू पावतो; परंतु काही दिवसांनी त्याची पत्नी आणि मुले कोरोनाबाधित असल्याचे समजते. त्यानंतर प्रशासनाला कळते की, रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

२. बहुतेक ग्रामीण भाग हे कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी सक्षम नाहीत. महामारीच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेकांना इतर गावांतील रुग्णवाहिका बोलवावी लागली.

३. प्रत्येक पंचायतीकडे एक रुग्णवाहिका पाहिजे. सध्या तशी परिस्थिती नाही. त्यामुळे इतर ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा शासनाने प्रत्येक पंचायतीला एक रुग्णवाहिका द्यावी.

४. मी जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्राने रुग्णवाहिका पुरस्कृत करण्यासाठी संपर्क केले, तेव्हा त्यांनी २६ लाख रुपये किमतीच्या २ रुग्णवाहिका पुरस्कृत केल्या. त्यांपैकी एक रुग्णवाहिका साळगाव आणि दुसरी शिवोली या ठिकाणी देणार आहोत. कळंगुट, कांदोळी आणि पर्रा या गावांत रुग्णवाहिका आहे.

५. पंचायत समिती आणि खासदार यांनी रुग्णवाहिका पुरस्कृत करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राशी संपर्क करावा. त्यांची ती पुरस्कृत करण्यासाठी सिद्धता असते. त्यामुळे अनेकांचा जीव वाचेल.’’

गोव्यात दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू, तर ४१३ नवीन कोरोनाबाधित

पणजी – गोव्यात १० जून या दिवशी कोरोनाबाधित १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची सख्या २ सहस्र ८९१ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र २९८ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४१३ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १२.५२ टक्के आहे. दिवसभरात ५८५ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ८६ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ५ सहस्र ६०५ झाली आहेे.