BMC Delays Drug Payments : मुंबई महानगरपालिकेने १२० कोटी रुपयांची औषधांची देयके ४ महिन्यांपासून थकवली !

देयके संमत न झाल्यास १३ जानेवारीपासून औषधांचा पुरवठा बंद करण्याची वितरकांची चेतावणी !

मुंबई – वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि चिकित्सालये येथे औषधांचा पुरवठा करणार्‍या वितरकांची सुमारे १२० कोटी रुपयांची देयके मुंबई महानगरपालिकेने ४ महिन्यांपासून थकवली आहेत. देयके थकवल्यामुळे वितरकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. परिणामी वितरकांनी तातडीने देयके संमत न झाल्यास १३ जानेवारीपासून औषधांचा पुरवठा बंद करण्याची चेतावणी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आली आहे.

१. मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, चिकित्सालये येथे ‘शून्य औषध चिठ्ठी योजना’ राबवण्याची केवळ घोषणाच केली.

२. ‘शून्य औषध चिठ्ठी’साठी आवश्यक निधी उपलब्ध करणे प्रशासनाला शक्य होत नसल्याने ही योजना वारंवार पुढे ढकलली जात आहे; मात्र सध्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात येणार्‍या औषधांची जवळपास १२० कोटी रुपयांची देयके मागील ४ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. या योजनेच्या अंतर्गत रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागणार नाहीत. ही औषधे त्यांना सरकारी रुग्णालयात मिळणार आहेत.

३. औषध वितरकांकडून वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही औषधांची देयके संमत झालेली नाहीत. त्यामुळे औषध वितरकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

४. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपआयुक्त संजय कुर्‍हाडे यांनी औषध वितरकांची देयके तातडीने संमत करण्याविषयी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना पत्र पाठवले आहे.

संपादकीय भूमिका

४ महिने देयके का थकवली, याचे कारण जनतेसमोर यायला हवे !