
भारतात वाढीस लागलेला ‘ई-कॉमर्स’ हा उद्योग पारंपरिक उद्योगांना हानीकारक ठरत आहे. वस्तू, अन्न, साहित्य न्यूनतम वेळात उपलब्ध करून देणारी ‘ई-कॉमर्स’ आस्थापने छोटे व्यापारी, अशिक्षित वस्तू विक्रेते यांच्यासाठी मारक ठरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात उपयोगात आलेल्या ‘ई-कॉमर्स’ आस्थापनांची बाजू आता अधिक बळकट झाली आहे. सुविधांच्या काळात गती आणि सुलभता या मुख्य दोन घटकांमुळे ई-कॉमर्स उद्योगांना मोठे यश प्राप्त झाले आहे. मोठे यश मिळवलेली यातील काही आस्थापने, म्हणजे ‘स्विगी’, ‘झोमॅटो’, ‘ब्लिंकिट’ आणि ‘झेप्टो’ यांनी वर्ष २०२३ मध्ये, म्हणजे ३२ सहस्र कोटी रुपये इतका एकूण लाभ कमावला. ही आस्थापने प्रामुख्याने ‘फूड डिलिव्हरी’, म्हणजे तयार (सिद्ध) अन्न लोकांना पोचवण्याचे काम करतात. स्वत:च्या घरी अन्न न शिजवता ते मागवून खाण्याचे प्रमाण किती आहे, हे या आस्थापनांच्या उत्पन्नातून लक्षात येते. नामांकित आणि लोकप्रिय उपाहारगृहांमधून लोकांच्या मागणीनुसार तयार अन्न पुरवण्याची गतीमान सुविधा देण्यात येत असल्याने ही आस्थापने अधिकाधिक लोकप्रिय झाली. ‘ब्रँड’ म्हणून नावारूपाला आलेल्या या आस्थापनांनी मागील वर्षभरात स्वतःचे अन्नपदार्थ उत्पादन विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. ‘झेप्टो’चे ‘झेप्टो कॅफे’ आहे, तर ‘ब्लिंकिट’चे ‘बिस्त्रो’ आणि ‘स्विगी’चे ‘स्नॅक’ या उपाहारगृहांचा उदय होत आहे. यांचे काम, म्हणजे ‘रेडी टू इट’, म्हणजे लगेच गरम करून खाता येण्यायोग्य पदार्थांना स्वतःच्या लहानशा आणि अधिक कार्यक्षमता असलेल्या उपाहारगृहांमध्ये गरम करून १५ मिनिटांमध्ये ते अन्न ग्राहकांपर्यंत पोचवणे. जे अन्न स्वतः बनवून खाता येऊ शकते, तेवढ्याच वेळात हे अन्न पोचवले जात आहे. लोकांची व्यस्तता आणि तात्काळ उपलब्धता यांवर ही आस्थापने मोठा पैसा कमवत आहेत. ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया’ने ‘स्विगी’ आणि ‘झोमॅटो’ यांच्या या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला असून ही आस्थापने त्यांची एकाधिकारशाही प्रस्थापित करत असल्याचा दावा केला आहे. या आस्थापनांच्या माध्यमातून दिवसाला अनुमाने
१ दशलक्ष ग्राहकांना दीड लाख उपाहारगृहांमधून तयार अन्न लोकांपर्यंत पुरवले जाते. ऑनलाईन काम करणार्या या आस्थापनांकडे लोकांचे नाव, क्रमांक आणि पत्ता आदी माहितीचा मोठा साठा उपलब्ध आहे, ज्याचा उपयोग करून ही आस्थापने स्वतःच्या उपाहारगृहांच्या लाभासाठी याचा वापर करत असून प्रस्थापित उपाहारगृहांचे ग्राहक स्वतःकडे खेचत आहेत. प्रत्यक्षात ही आस्थापने अन्न पोचवतांना संबंधित उपाहारगृहांकडून १५ ते २५ टक्के इतके ‘कमिशन’ (दलाली) घेत असून या क्षेत्रात स्वतःची मक्तेदारी निर्माण करत असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. ‘झोमॅटो’ आणि ‘ब्लिंकिट’ यांनी स्वतःच्या उत्पादनांसाठी ग्राहकांच्या माहितीचा वापर करणार नसल्याचे म्हटले आहे. वर्ष २०२२ मध्ये या आस्थापनांनी अन्नाच्या किमती वाढवल्या होत्या, तसेच पदार्थांवरील सवलतही परस्पर ठरवल्याचा आरोप झाला होता. अनेक उपाहारगृहे नव्या ग्राहकांसाठी या आस्थापनांवर अवलंबून असतात. भारतातील अन्न उद्योगाचे भवितव्य या आस्थापनांमुळे उजळले असले, तरी लहान उपाहारगृहे किंवा एखाद्या कुटुंबाकडून चालू असलेल्या व्यवसायांना ‘रिव्ह्यू’ (प्रतिसाद) न्यून मिळण्याच्या भीतीमुळे तणावाला सामोरे जावे लागत आहे.
याकडे दुर्लक्ष नकोच !
आताचे हे चित्र भारतातील अन्न उद्योगाचे असले आणि त्याचे भवितव्य चांगले असले, तरी याच्या परिणामांचा विचारही व्हायला हवा. बाहेरचे पदार्थ खाण्याविषयीची लोकांची ओढ आणि काम न करण्याचा आळस किती शिगेला पोचलेला आहे, याचे हे ठळक उदाहरण म्हणावे लागेल. बर्याचदा सवलत मिळत असल्याने लोक वस्तूंची खरेदी करतांना आढळतात, तसेच अन्नपदार्थांचेही आहे. जे काही चांगले स्वतः बनवून खाऊ शकतो, ते सवलतींच्या मायाजाळात अडकून आवश्यकता नसतांना तयार मागवले जाते. भारत ही जगासाठी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे आणि अनेक तज्ञांच्या मते भारतीय बाजारपेठ ही एक ‘प्रयोगशाळा’ आहे. भारतातील लोक किती भुलतात, हे तज्ञांना ज्ञात असल्याविना त्यांनी भारताला प्रयोगशाळा संबोधलेले नाही, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.
घरी जेवण बनवलेले असतांनाही केवळ चवीसाठी म्हणून तयार जेवण मागवण्याची प्रथा पडली आहे. घरी बनवलेले सकस जेवण सोडून कुठल्या तरी तेलात, निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरून बनवलेले पदार्थ चवीने खाल्ले जातातच कसे ? हा प्रश्न आता वयस्कर होत असलेल्या पिढीला पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे, जो अत्यंत योग्य आहे. ‘जे खातो, तसेच आपण स्वतः बनतो’, या सिद्धांतानुसार तयार पदार्थांमुळे आपण कसे बनत आहोत, याकडे दुर्लक्ष होत आहे, जे भविष्यासाठी हानीकारक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. जेवणातूनच शरीर आणि मन घडते. स्वतः बनवलेल्या अन्नाची चव, समाधान आणि आनंद बाहेरून मागवलेल्या अन्नाच्या केवळ चवीवर भागवले जात आहे. अन्नपदार्थातील पौष्टिकतेवर भर देणारी मागची पिढी ‘इन्स्टंट’ मागवून खाणार्या आणि स्वतःच्या देहाची करून घेत असलेली हानी त्रयस्थपणे पहात आहे. स्वतःच्या या चुकीच्या कृतींकडे होत असलेले दुर्लक्ष मनुष्यासाठी सर्वथा हानीकारक आहे.
‘इन्स्टंट’च्या नित्य उपयोगाने काही गोष्टी मनुष्य विसरत चालला आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रत्यक्ष कृती आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष संवाद ! वस्तू खरेदी असो वा अन्नपदार्थ मागवणे असो. एखादी सोपी स्वतः वस्तू अथवा पदार्थ स्वतः बनवण्यातील आनंद डावलून आयत्यावर भर देणे, यातून मनुष्य आयुष्य जगणे विसरत चालला आहे. एखादी वस्तू आवडली नाही, तर परत पाठवणे, यासाठी जेवढा वेळ लागतो तोच वेळ वस्तू प्रत्यक्ष बघून विकत घेण्यातही देऊ शकतो, ही मानसिकता आता अल्प होत चालली आहे.
कठीण काळाची आवश्यकता अथवा आपत्काळ म्हणून मागवल्या जाणार्या गोष्टींचे रूपांतर आता ‘घरी बसल्या काम’, ‘घरी बसल्या किराणा माल’, ‘बसल्या बसल्या तयार जेवण’, ‘५ मिनिटांत भाजीपाला, औषधे’ यांनी घेतले आहे. ‘कमेंटस्’ (प्रतिक्रिया) आणि ‘रिव्ह्यू’ (समीक्षा) यांमुळे मागे पडला आहे, तो प्रोत्साहन देणारा प्रत्यक्ष संवाद, त्यातून निर्माण होणारी आपुलकी, शेजारधर्म, आणि पर्यायाने माणुसकी ! पूर्वीच्या काळातील लोकांमध्ये पुष्कळ आपुलकी असल्याचे आताच्या प्रौढ पिढीने पाहिले आहे. हे कशामुळे ? तर प्रत्यक्ष संवाद आणि कृती यांमुळे ! केवळ ‘रिल्स’ पाहून पोट भरत नसल्याने अन्नपदार्थ मागवला जातो आणि त्याच्या चवीवर मन भागवण्यापेक्षा स्वतः कृती करण्यातील आनंद घेण्यास आता प्रत्येकाने शिकलेच पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत ‘ऑनलाईन’ माध्यमे बंद पडल्यावर स्वतः कृती करण्याचा संघर्ष करण्यापेक्षा त्याची सवय आताच लावून घेणे योग्य नाही का ?
तयार अन्नाच्या चवीसाठी चालू असलेला लोकांचा खटाटोप अन्नपदार्थ तयार करण्यासाठी झाला, तर त्याचा सर्वाधिक लाभ स्वतःलाच होईल ! |