सातारा, ८ जून (वार्ता.) – कोरोनाविषयी जनतेच्या मनात असलेल्या या २५ प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी द्यावीत, असे आव्हान भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे. याविषयीचे एक पत्रक खासदार भोसले यांच्या कार्यालयाकडून काढण्यात आले आहे.
पत्रकात नमूद केले आहे की, कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हानी झाली असून कोरोना हे मोठे षड्यंत्र असल्याची भावना त्यांच्या मनात आहे. कोरोना, औषधपद्धती आणि इतर यांविषयी अनेक प्रश्न जनतेच्या मनात असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची उत्तरे मागणे माझे उत्तरदायीत्व आहे. रेमडेसिविरवर बंदी असूनही ती अॅन्टीव्हायरल म्हणून कुणी आणि कोणत्या आधारे उपयोगात आणण्यास अनुमती दिली ? रेमडेसिविर आणि स्टेरॉईड्स यांमुळे म्युकरमायकोसिसचा होतो असा निष्कर्ष असूनही का उपयोगात आणण्यात आली ? कोरोनावर नेमके औषध उपलब्ध आहे का ? असेल, तर त्यापैकी आपल्याकडे कोणते औषध उपलब्ध आहे ? नेमके औषध उपलब्ध नसेल, तर आतापर्यंत (वर्षभर) रुग्णांवर उपचारासाठी कोणत्या औषधांचा उपयोग करण्यात आला ? मृतांची ऍटॉप्सी का केली जात नाही ? एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष कसे काय येतात ? दळणवळण बंदी असूनही रुग्णवाढीची कारणे काय ? रुग्णसंख्येचा वेग मंदावण्यास विलंब का झाला ? आकडेवारीतील घोळामुळे रुग्णसंख्या वाढत होती का ? अहवाल येण्यास विलंब होत होता, तर इतर माहिती जाहीर होतांना बाधितांचा आकडा किती असेल ? आकडेवारीतील घोळाविषयी संबंधित दोषींवर काय कारवाई केली ? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग का झाले नाही ? तिसरी लाट येणार हे सांगतांना त्यामागील आधार काय ?
बाहेर फिरणार्या नागरिकांची बळजोरीने कोरोना चाचणी करणे कोणत्या नियमावलीत बसते ? विकेंड दळणवळण बंदीसाठी कोणता आधार, तर्क लावण्यात आला आहे ? आयुर्वेदिक उपचार पद्धतीला शासन अधिकृतता का देत नाही ? इत्यादी प्रश्न पत्रकात नमूद करण्यात आले आहेत.