डॉ. अभय बंग यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सर्वत्र मद्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन नागरिकांचे आरोग्य बिघडते, या सत्याचा सरकारने विचार करून उचित निर्णय घ्यावा !
नागपूर – ‘मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दळणवळण बंदी उठवण्याविषयी अधिकारबाह्य घोषणा करून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण केली होती. त्यांनी २९ मे या दिवशी चंद्रपूरपाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यातीलही मद्यबंदी उठवण्यासाठी समिती नियुक्त करण्याची जाहीर सूचना गडचिरोली येथे केली. त्यामुळे आदिवासी आणि स्त्रिया यांचे हित अन् राज्य सरकारची भूमिका यांविषयी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात संशय अन् गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ आणि सरकारचा हेतू यांविषयी लोकांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त करावे’, असे आवाहन महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केले आहे.
डॉ. अभय बंग यांनी पत्रात म्हटले आहे की, मंत्री वडेट्टीवार यांचा हा गोंधळ अजाणतेपणी घडलेला नाही. त्यांना चंद्रपूर येथे वार्षिक १ सहस्र कोटी रुपयांचा आणि गडचिरोली येथे ५०० कोटी रुपयांचा मद्य व्यापार उभा करायचा आहे. त्यासाठी त्यांनी हे केलेले सूतोवाच आहे. मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवार यांचा हा गोंधळ निस्तरावा. गडचिरोली जिल्ह्यात वर्ष १९९३ मध्ये खासदार शरद पवार हे मुख्यमंत्री असतांना मद्यबंदी लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या ‘मद्य-तंबाखू नियंत्रण राज्यस्तरीय टास्क फोर्स’ अंतर्गत नियंत्रणाचा प्रयोग चालू आहे. त्यासाठी ‘मुक्तिपथ’ ही संघटना निर्माण करून १ सहस्र १०० गावांनी ‘मद्यमुक्ती संघटना’ स्थापन केल्या आहेत.