नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करा ! – खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी केला आहे.  हेमामालिनी यांनी याविषयी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी मथुरावासींना ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त हा संदेश दिला आहे.

या व्हिडिओमध्ये हेमामालिनी यांनी म्हटले आहे की, प्राचीन काळापासून भारतात हवन करण्याची प्रथा आहे. त्याद्वारे नकारात्मक शक्तींना दूर करून वातावरण शुद्ध करण्यात येते. हवन हाच त्यावरील उपाय सांगण्यात आला आहे आणि तो लाभदायकही आहे. आज संपूर्ण जग महामारी आणि पर्यावरण हानी यांच्या संकटात आहे. अशा वेळी महामारीचे संकट दूर होईपर्यंत प्रतिदिन हवन केले पाहिजे.