या वर्षीचा शिवराज्याभिषेकदिन घरात राहून साजरा करा ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

कोल्हापूर, ३ जून – या वर्षी कोरोनामुळे शिवराज्याभिषेकदिन साधपेणाने साजरा केला जाणार आहे. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडितपणे साजरा करण्याचे दायित्व माझे असेल. तरी आपण सर्वांनी या वर्षीचा शिवराज्याभिषेकदिन घरात राहून साजरा करावा, असे आवाहन भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सामाजिक माध्यमांद्वारे केले आहे.

मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणार्‍या कडे-कपार्‍या आणि शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची उपस्थिती आणि सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज हे वातावरण अनुभवायला आपण उत्सुक आहोत; पण कोरोना संकटामुळे मर्यादा येत आहेत. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराजही पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे. यासाठी आपण सर्वांची घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू आणि पुढील दिशा ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरून घोषित करेन, असेही खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी घोषित केले आहे.