विवाह हा कुठला करार नव्हे, तर ते एक पवित्र बंधन ! – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – विवाह हा कुठला करार नव्हे, तर ते एक पवित्र बंधन आहे, अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केली.  पती आणि पत्नी यांना जाणीव झाली पाहिजे की, अहंकार अन् असहिष्णुता हे पायातील जोड्यांप्रमाणे असून घरात पाऊल ठेवण्यापूर्वी ते बाहेरच काढून आत यायला हवे अन्यथा त्याचे परिणाम त्यांच्या मुलांवरही होतात.

तमिळनाडूतील सलेम जिल्ह्यातील शासकीय अधिकारी डॉ. पी. शशिकुमार यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध ‘घरगुती हिंसा अधिनियम, २००५’ अंतर्गत तक्रार प्रविष्ट केली होती. त्याआधारे त्यांना पशुपालन आणि पशुविज्ञान विभागाच्या संचालकांनी १८ फेब्रुवारी २०२० या दिवशी सेवामुक्त केले. या निर्णयाला डॉ. शशिकुमार यांनी याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने ही याचिका प्रविष्ट करून घेत त्यावरील सुनावणीच्या वेळी वरील टिप्पणी केली. या दोघांनीही एकमेकांविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज प्रविष्ट केले आहेत. डॉ. शशिकुमार यांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यास न्यायालयात आव्हान दिले होते.