आषाढी वारीसाठी नियमांसह अनुमती द्यावी, अन्यथा मंत्रालया समोर आंदोलन करू ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज

सोलापूर, ३१ मे (वार्ता.) – येत्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी आणि पालखी घेऊन येण्यासाठी किमान ५० भाविकांना अटी आणि नियम यांसह अनुमती द्यावी. पंढरपूर येथे बाहेरून येणार्‍या दिंड्यांनाही नगर प्रदक्षिणेसाठी अनुमती द्यावी. अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी संगणकीय पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. वारकरी वारीची परंपरा नित्यनेमाने सांभाळतो. कोरोनाच्या संसर्गामुळे वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढी वारी, श्रावण मास, अधिकमास, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव सरकारच्या सूचना स्वीकारून साजरे केले. आतापर्यंत सरकारला सहकार्यच केले.

२. पंढरपूर पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणुकीच्या प्रचारार्थ पुष्कळ सभाही घेण्यात आल्या. निकालानंतरचा विजयोत्सव साजरा करण्यात आला, मग राजकीय कार्यक्रम चालतात, तर वारीला अडचण का ? सरकार आणि अधिकारी वारीकडे सकारात्मक दृष्टीने पहात नाहीत. आषाढी वारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे वारीला अनुमती मिळायला हवी.

वारकर्‍यांच्या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल ! –  गणेश महाराज शेटे, संस्थापक अध्यक्ष, विश्व वारकरी सेना

(प्रतिकात्मक छायाचित्र)

अकोला – आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी सोहळ्यात मानाच्या ९ पालख्यांसमवेत प्रत्येक तहसीलअंतर्गत पालखी सोहळ्याला अनुमती देण्यात यावी, अशी मागणी ‘विश्व वारकरी सेने’चे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वारकर्‍यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणीही ‘विश्व वारकरी सेने’च्या वतीने सरकारला देण्यात आली आहे.

‘विश्व वारकरी सेने’ने म्हटले आहे की, नियम आणि अटी यांसह मानाच्या पालखी सोहळ्यात न्यूनतम ५०० वारकर्‍यांना सहभागी होता यावे. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश यांसह कर्नाटक प्रांतातील अनेक पालख्या पायी पंढरपूर येथे येत असत. ‘कोरोनाचा संसर्ग असूनही सरकारने पंढरपूर येथे विधानसभेची पोटनिवडणूक घेतली. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या सभा, मेळावे, बैठका झाल्या आणि निवडणूकही पार पडली; मात्र तेव्हा कोरोनाच्या संसर्गाचा विचार करण्यात आला नाही’, असा आरोपही ‘विश्व वारकरी सेने’ने केला आहे.