भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्यशासनाकडे मागणी
पनवेल, १८ मे (वार्ता.) – लागोपाठ दुसर्या वर्षी ऐन हंगामात आलेल्या भीषण ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांची पुष्कळ हानी झाली आहे. केवळ कागदावरचे आदेश आणि घोषणा न करता आंबा बागायतदार अन् वादळग्रस्त शेतकरी यांच्या साहाय्यासाठी प्रत्यक्ष अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे. कोकणातील उद्ध्वस्त शेतकर्यांना बांधावर जाऊन शासनाने तातडीने साहाय्य करावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्यशासनाकडे केली आहे.
प्रशांत ठाकूर यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोकणातील हंगामी उत्पन्नाचे सर्व मार्ग ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे संपुष्टात आले असून कोकणी अर्थव्यवस्थेस यापूर्वी आधीपेक्षा पुष्कळ मोठा फटका बसला. कोकणासमवेतच पश्चिम महाराष्ट्रातही आंबा पिकाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे राज्यशासनाने तातडीने शेतकर्यांना साहाय्य केले पाहिजे.