नागपूर येथे ‘म्युकरमायकोसिस’ आजारावर कार्यवाही योजनेची निर्मिती

अधिकार्‍यांसह तज्ञांच्या बैठकीत चर्चा

नागपूर – शहरात ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचे थैमान वाढले आहे. या आजारामुळे अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत, तर काहीचे जबडे काढावे लागले. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘कार्यवाही योजना’ (अ‍ॅक्शन प्लॅन) सिद्ध करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली १६ मे या दिवशी बैठक घेण्यात आली. बैठकीत यावर तज्ञांसह प्रशासकीय यंत्रणेसमवेत चर्चा करण्यात आली.

‘ब्लॅक फंगस’ किंवा ‘म्युकरमायकोसिस’ या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या आजारावरील औषधे महागडी आहेत. त्यातच काळाबाजार करून ती औषधे आणखी अधिक दरात विकली जात आहेत. (एखाद्या आजारावर औषधाची मागणी वाढल्यास लगेच त्या औषधाचा काळाबाजार चालू होतो. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी काळाबाजार करणार्‍यांवर आतापर्यंत कठोर कारवाई न केल्याने त्यांचे फावते. त्यामुळे अशा गोष्टींना प्रशासनच उत्तरदायी आहे. – संपादक)

‘म्युकरमायकोसिस’ या आजारावर मिळणारे ‘एम्फोटेरेसीन बी’ हे इंजेक्शन बनवण्याची अनुमती मिळाल्याने आता ते औषध स्वस्तात उपलब्ध होणार आहे; पण या इंजेक्शन निर्मितीला आणखी १५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरात सध्या ४५ हून अधिक रुग्ण शासकीय दंत महाविद्यालयात, तर ११ रुग्ण हे मेयो रुग्णालयात उपचार घेत आहेत.