‘शरद पवारसाहेब, तुम्ही मद्यवाल्यांसाठी पत्र लिहिले; शेतकर्‍यांसाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा !’

माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची खासदार शरद पवार यांना पत्राद्वारे मागणी

माजी कृषीमंत्री अनिल बोंडे

अमरावती – ‘जनसेवेमध्ये मग्न असणारे बारमालक, मद्य विक्रेते यांना मालमत्ता कर, विजेचे देयक, अबकारी कर यांमध्ये सवलत देण्याची मागणी करण्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. मुख्यमंत्री शरद पवार यांचे ऐकतात; म्हणून मद्यवाल्यांची ही मागणी पूर्ण होईल. महाराष्ट्रातील १ कोटी ५० लाख शेतकर्‍यांची मागणीही आपण मांडावी. या शेतकर्‍यांसाठी, पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा ना’, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करून या पत्रातून जाहीर अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ‘केंद्रीय कृषीमंत्री राहिलेले शरद पवार यांनी शेतकरी, शेतमजुरांविषयी पत्रामध्ये एकही शब्द लिहिला नाही. महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात एक दमडीही शेतकर्‍याच्या खात्यात टाकली नाही. राज्यातील ९४ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात साहाय्यासाठी ६ सहस्र रुपये टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रातून सांगावे’, असे बोंडे यांनी पत्रात म्हटले आहे.