सातारा, १२ मे (वार्ता.) – जिल्ह्यात उद्भवणार्या संभाव्य आपत्ती निवारणासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वच यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवत सिद्ध रहावे. तसेच संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीविषयी मान्सूनपूर्व सिद्धता आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तेव्हा ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत. तसेच पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक विभागाने नोडल अधिकार्यांची नियुक्ती करून त्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला द्यावी. ज्या गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो, अशा गावांना पुरेशा प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अगोदरच करून ठेवावा. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायती सीमेतील नालासफाई, गटारे यांची स्वच्छता करून घ्यावी. आरोग्य विभागाने आवश्यक तो औषधसाठा, रुग्णवाहिका यंत्रणा सिद्ध ठेवावी. तसेच वीजवाहक तारांना अडथळा निर्माण करणार्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात. नदीकाठी अतिक्रमण केलेल्या कुटुंबाला मान्सूनपूर्वी सूचना (नोटीस) देऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच संबंधित विभागांनी तालुका आणि गावपातळीवर २० मेपर्यंत मान्सूनपूर्व सिद्धतेविषयी आढावा बैठक घ्यावी.