कोल्हापूर – कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे राज्यात दुसर्यांदा दळणवळण बंदी लागू करण्यात आल्याने वस्त्रोद्योगाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. या बंदीमुळे कामगारांना कामावर उपस्थित होण्यात अडचणी येत असल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. कापड दुकान बंद असल्यामुळे विक्री ठप्प आहे. पूर्वी झालेले सौदे रहित झाल्याने हानी होत असल्याने उद्योजक चिंतेत आहेत.
महाराष्ट्र हे वस्त्रनिर्मितेचे मुख्य राज्य आहे. देशातील सर्वाधिक माग राज्यात आहेत. वस्त्रनिर्मितीची साखळी तुटत असल्याने कापड निर्मिती मंदावली आहे. परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी परतल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. नवी देहली, सुरत, कर्णावती (अहमदाबाद), कोलकाता यांसारख्या मोठ्या बाजारपेठा बंद असल्याने कापड विक्रीवर परिणाम झाला आहे. राज्यातील मुख्य बाजार पेठ मुंबई तसेच अन्य ठिकाणची दुकाने, मॉल बंद असल्याने वस्त्रोद्योग धोक्यात आला आहे.
राज्यातील भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर, विटा, नागपूर या प्रमुख क्षेत्रांतील यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे. कामगारांचा अंदाजे ३२५ कोटी रुपयांचा रोजगार बुडाला आहे. वीज महावितरणाला ५० कोटी रुपयांच्या वीज विक्रीवर पाणी सोडावे लागत असल्याची माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली.