उजनी धरणाने गाठला तळ

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर पाणी संकट

इंदापूर (जिल्हा पुणे) – पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिले आहे, तर दळणवळण बंदीमुळे इंदापूरकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.

१० मे या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात २.७० टक्के इतकेच पाणी शेष आहे. धरणाची पाणी पातळी ४९१.१३५ मीटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा १.४४ टी.एम्.सी. इतका शेष आहे. तर उजनी धरणातून सिना-माढा बोगदा २९६ क्युसेस, दहिगाव एल्.आय.एस्. (फाटा) ८५ क्युसेस, उपकॅनल (फाटा) ६५० क्युसेस आणि मुख्य कॅनलमधून सोलापूरसाठी ३ सहस्र १५० क्युसेसने पाणी विसर्ग मागील अनेक दिवसांपासून चालू आहे, तर सध्या उजनीतून एकूण ४ सहस्र १८१ क्युसेसने पाणी विसर्ग सोलापूर भागासाठी चालू असल्याने धरणाची पाणी पातळी १ ते २ दिवसात खालावत जाण्याची शक्यता आहे.