गोव्यात मुख्यमंत्र्यांचे किराणा मालासाठी गर्दी न करण्याचे जनतेला आवाहन

पणजी, ८ मे (वार्ता.) – ८ मे या दिवशी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार गोव्यात ९ मे या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून २३ मेपर्यंत राज्यस्तरीय संचारबंदी लागू होत आहे. संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर किराणा खरेदीसाठी सर्वच ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदीच्या काळातही किराणा दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू असणार असल्याने खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी न करण्याचे आवाहन एक व्हिडिओ प्रसारित करून केले आहे. भाजपचे माजी खासदार तथा गोवा बागायतदार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड्. नरेंद्र सावईकर यांनीही पुढील १५ दिवस गोवा बागायतदाराचे सूपर मार्केट दुपारी १ वाजेपर्यंत उघडे रहाणार असल्याने लोकांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. ८ मेच्या आदेशानुसार मासळी बाजार आणि पालिका बाजार बंद रहातील.

संचारबंदीचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई करू ! – मुकेश कुमार मीना, पोलीस महासंचालक

राज्यात ९ मेपासून चालू होणार्‍या संचारबंदीचे नागरिकांनी कठोरतेने पालन करावे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संविधान यांअतर्गत कठोरेने कारवाई करतील, अशी चेतावणी गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी ८ मे या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.