जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे निवडणूक माहिती कक्षनिहाय (बुथ) चालू करावेत ! – चिन्मय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते 

सातारा, ५ मे (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. जिल्ह्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक माहिती कक्षाप्रमाणे (बुथ) लसीकरणे केंद्रे उभारून लसीकरण चालू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे शाळा बंद आहेत. आणखी दोन मास शाळा बंदच असतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व शाळांचा लसीकरण केंद्र म्हणून उपयोग करू शकतो. तसेच पहिल्या फळीतील कोरोना योद्धे यांचे २ डोस लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना उपयोग आपण लसीकरणासाठी करू शकतो. तसेच दुर्गम भागातून लसीकरणासाठी नागरिक येऊ शकत नसतील, तर ते जेथे आहेत तिथे जाऊन लसीकरण करू शकतो. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे साहाय्य घेऊ शकतो. जेणेकरून अल्प कालावधीत १०० टक्के लसीकरण पूर्ण होऊ शकेल.