कोल्हापूर, ५ मे – राज्यातील सर्वांत मोठा संघ असलेल्या गोकुळमध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) सत्तांतर झाले असून महाडिक गट पराभूत झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने १७ जागा मिळवल्या आहेत, तर महाडिक गटातील अमरीश घाटगे, चेतन नरके, शौमिका महाडिक आणि बाळासाहेब खाडे असे ४ जणच निवडून आले आहेत.
५८ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या दूध संघाचे संकलन प्रतिदिन १४ लाख लिटर आहे. अडीच सहस्र कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या संघावर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षाची धडपड असते. विजय मिळाल्यावर सतेज पाटील म्हणाले, गोकुळ हा दूध उत्पादक शेतकर्यांच्या मालकीचा व्हावा ही आमची इच्छा होती. त्याला मतदारांनी अनुकूल कौल दिला आहे. दुधाला प्रतिलिटर २ रुपयांची वाढ देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करू.