ताकतोडा (जिल्हा हिंगोली) येथे पैसा नसल्याने गांजा लागवडीची अनुमती द्यावी !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव पतंगे यांची शासनाकडे मागणी

हिंगोली – जिल्ह्यात कोरोनाच्या संकटामुळे बाजारात शेतीमालास भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने पिकांची हानी झाली आहे. अधिकोष बंद असल्याने पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शासनाने गांजा लागवडीची अनुमती द्यावी, अशी मागणी ताकतोडा (तालुका सेनगाव) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी केली आहे. पतंगे यांनी शासनाकडे, तसेच महसूल आणि पोलीस विभाग यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील वर्षी पाऊस आणि कोरोना यांमुळे शेतकर्‍यांची हानी झाली. यंदाही कोरोनाची परिस्थिती कायम आहे. शासनाने ‘दळणवळण बंदी’ लागू केल्यामुळे घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. कृषीनिविष्ठा विक्रीची दुकाने उघडी असली, तरी दुकानावर होणार्‍या गर्दीने कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यातच यावर्षी अद्यापही अधिकोषांनी पीककर्ज वाटप केलेले नाही. शासनाने अधिकोषांचे व्यवहार १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे बँकेत शेतकर्‍यांना येऊ दिले जात नाही. आता पेरणीचा हंगाम तोंडावर आला आहे. पैसा नाही आणि शासनाकडून प्रतिदिन काढले जाणारे आदेश यांमुळे शेतकरी आणि शेतमजूर मेटाकुटीला आले आहेत.